नागपूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांचे गुरुवारी दिल्लीत निधन झाले. सात वर्षांपूर्वी नागपूर विद्यापीठाने त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. पण त्याला उजव्या विचाराच्या संघटनांनी विरोध केल्याने विद्यापीठाने ऐनवेळी त्यांचा कार्यक्रम रद्द केला होता. यावरून बराच वादंगही झाला होता. यानंतरही येच्युरी नागपुरात आले होते व त्यांचे व्याखानही झाले. पण ते इतर ठिकाणी. “विद्यापीठानेच कार्यक्रम ठरवला, त्यांनीच तिकीट पाठविले मग कार्यक्रम रद्द करण्याचा दबाव कुठून आला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता ?

सात वर्षांपूर्वी म्हणजे मार्च २०१७ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येच्युरी यांना एका व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. विद्यापीठाच्या ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारांच्या पदव्युत्तर विभागा’तर्फे १८ आणि १९ मार्च २०१७ रोजी ‘भारतीय लोकशाहीचे क्षरण: आव्हाने आणि उपाय’ या विषयावर ते बोलणार होते. मात्र डाव्या पक्षाच्या नेत्याला विद्यापीठात निमंत्रित करण्यास त्यावेळी उजव्या विचाराच्या संघटनांनी त्याला विरोध केला होता. तत्कालीन कुलगुरू एस.एम. काने यांनी अचानक हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला होता. तो रद्दच केला होता. त्यावरून मोठे वादंग झाले होते. त्यातून शैक्षणिक वर्तुळ ढवळून निघाले होते. त्यानंतर नागपुरातील पुरोगामी विचारांच्या संघटनांनी येच्युरी यांच्याशी संपर्क साधून त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

हेही वाचा – बापरे, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नावानेही फसवणूक

हेही वाचा – नागपूर ‘हिट अ‍ॅण्ड रन’मुळे चर्चेत आलेल्या लाहोरी बारवर वरदहस्त कुणाचा?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालायत हा कार्यक्रम पार पडला होता. ‘भारतीय लोकशाहीचा ऱ्हास’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता व त्यात येच्युरी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. केंद्रातील सरकारमुळे देशातील विषमता वाढली असून अवघ्या एक टक्का लोकांच्या हातात जीडीपीचा ५८ टक्के हिस्सा असल्याचे प्रतिपादन येच्युरी यांनी केले होते. या कार्यक्रमाला नागपूरकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. आपल्या भाषणात सीताराम येचुरींनी सामाजिक-आर्थिक विषमतेवर भाष्य करताना भाजप सरकार-संघावर हल्लाबोल केला होता. लोकशाहीच्या आधारे देश चालावा असे समाजातील काही घटकांना वाटत नसल्याचे ते म्हणाले होते. धर्माचा दुरूपयोग वाढल्यामुळे दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्याचा दावाही त्यांनी केला होता. विद्यापीठाने आयोजित केलेला कार्यक्रम अचानक रद्द करण्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.