नागपुरी संत्रीला विदेशातून मागणी व्हावी म्हणून केलेल्या प्रयत्नाला यंदा यश आले. परंतु पुरवठा करतानाच करोना संकट ओढवले. टाळेबंदीमुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा करता न आल्याने याचा मोठा फटका विदर्भातील संत्री उत्पादकांना बसला आहे. एकूण २० पैकी फक्त ५ कंटेनर संत्री निर्यात करणे शक्य झाल्याचे विदर्भातील संत्री उत्पादकांची संस्था असलेल्या महाऑरेंजचे संचालक श्रीधर ठाकरे यांनी सांगितले.
अमरावती, नागपूर जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र त्याला बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीत तो विकावा लागतो. त्याला विदेशात मागणी वाढावी म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. निर्यातक्षम संत्री उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यापासूनतर त्यांना तशा कलमा उपलब्ध करून देण्यापर्यंत सरकारने प्रयत्न केले. निर्यातीसाठी आवश्यक त्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या होत्या. या प्रयत्नामुळे यंदा विदर्भात मोठय़ा प्रमाणात निर्यातक्षम संत्री उत्पादन झाले.
फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून नागपुरी संत्र्यांचे पहिले कंटेनर (२२ टन ) नवी मुंबईच्या वाशी येथून १३ फेब्रुवारीला दुबईला रवाना झाले होते. अशा प्रकारचे एकूण २० कंटेनर पाठवण्याचे नियोजन होते. त्यापैकी पाच पाठवले. अचानक मार्च महिन्यात टाळेबंदी जाहीर केल्याने उर्वरित कंटेनर पाठवता आले नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.
विदेशात बाजारपेठ मिळावी म्हणून केलेल्या प्रयत्नानंतर प्रथमच दुबईतून चांगली मागणी आली. तसेच संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने ते करोनावरही परिणामकारक ठरते असे डॉक्टरांनी सांगितल्याने इतर देशातूनही मागणी वाढली होती. केंद्र सरकारच्या खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने निर्यातीसाठी मदतीचा हात पुढे केला होता. पण टाळेबंदीमुळे नियोजन फिस्कटले व त्याचा फटका निर्यातीला बसला. फळ निर्यात व वाहतुकीला टाळेबंदीत परवानगी असली तरी गावपातळीवरून संत्री गोळा करणे, ट्रकमध्ये टाकणे, जिल्हा पातळीवरून बंदरापर्यंत पोहोचवणे यासाठी मजूर आणि ट्रक उपलब्ध नाही. या परिस्थितीत काही ट्रक आम्ही पाठवले. पण ते देशाच्या विविध भागात अडकून पडले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे पोहचणे शक्य झाले तरी निर्यातीसाठी ते उपयोगी पडले नाही. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत ही संत्री विकण्याशिवाय पर्याय नव्हता, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.
मागील वर्षी पाण्यामुळे संत्री बागा वाळल्या होत्या. सरकारने सर्वेक्षण करूनही अद्याप मदत दिली नाही. यंदाही टाळेबंदीचा फटका उत्पादकांना बसला. ३०० ते ५०० टन संत्री निर्यात होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यांना आर्थिक मदतीचे पॅकेज सरकारने जाहीर करावे.
-श्रीधर ठाकरे, संचालक, महाऑरेंज.