आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार कृष्णा खोपडेंची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्मार्ट सिटी’ योजनेची घोषणा केल्यानंतर प्रत्येक योजनेला ‘स्मार्ट’ हे नाव देण्याचा प्रघातच अलीकडच्या काळात पडला आहे. महापालिकेने अलीकडेच ‘स्मार्ट स्ट्रिट’ची घोषणा केली असून आता भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी त्यांच्या मतदारसंघातील कळमना भागात ‘स्मार्ट किराणा बाजार’ सुरू करण्याचा संकल्प केला आहे. खोपडे यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांचे एक शिष्टमंडळ गुरुवारी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर यांना भेटले व त्यानंतर खोपडे यांनी कळमन्यातील चिखली येथे ‘स्मार्ट किराणा बाजार’ सुरू करणार असल्याचे जाहीर केले.

सध्या इतवारी भागात ठोक किराणा बाजार आहे, मात्र तेथील अरुंद रस्त्यामुळे व्यापारी व ग्राहकांची गैरसोय होते. वाहने नेण्यासही तेथे जागा नाही, वाहनतळासाठीही जागा नाही. त्याचा फटका व्यावसायिकांनाही बसतो. या अडचणी लक्षात घेऊन खोपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती व त्यांना कळमना येथे हा बाजार स्थानांतरित करण्याची विनंती केली होती. फडणवीस यांनी त्याला मान्यताही देत नागपूर सुधार प्रन्यासला याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार हा बाजार सुरू होणार आहे. येथे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या परिसरात बँक, उपाहारगृह, संगणकीय धर्मकाटा, वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उद्यान आणि इतरही सुविधांचा समावेश असणार आहे. बाजार सुरू झाल्यानंतर तेथील परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. इतवारीतील किराणा ओळीतील व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून गाळे वाटप केले जाणार आहे. बैठकीला भाजपचे शहर उपाध्यक्ष मेघराज मैनानी, प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय वाधवानी, रमेश मंत्री, संजय सुचक, हरिश कृष्णांनी, प्रकाश वाधवानी, शिवप्रतापसिंह, प्रदीप पंजवानी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart market scheme in nagpur