यवतमाळ : ‘तो’ नववीत असताना नापास झाला आणि आपला मुलगा आता शिक्षणात टिकणार नाही, या समजातून वडिलांचा त्याच्यावरील विश्वास कमी झाला. वडिलांचा गमावलेला हा विश्वास संपादन करण्यासाठी तो इरेला पेटला आणि त्याने चमत्कार घडविला. अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यंत कठीण समजली जाणारी ‘जेईई मेन्स’ या परीक्षेत त्याने चक्क ९६ टक्के परसेंटाईल गुण मिळवून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळविणारा विद्यार्थी आहे सोहम अविनाश राऊत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जेईई मेन्स’ ही अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी घेण्यात येणारी सर्वात मोठी आणि तितकीच कठीण परीक्षा मानली जाते. देशभरातील आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातील आर्णी येथील श्री.म.द. भारती महाविद्यालयातील सोहम अविनाश राऊत या विद्यार्थ्याने तब्बल ९६ परसेंटाईल गुण प्राप्त केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने मिळविलेल्या या यशामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श निर्माण झाला आहे.

हेही वाचा – मुंबई: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवा ;एस.टी. महामंडळाच्या वाहतूक खात्याच्या विभाग नियंत्रकांना सूचना

सोहम हा महाज्योतीतर्फे घेण्यात येत असलेल्या जेईई मेन्स प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी आहे. आईने दिलेल्या प्रेरणेमुळे, प्रोत्साहनामुळे मी जेईई देऊ शकलो. वडील शेतकरी असून, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मी शाळेत असतांना चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचो. इयत्ता नववीत असताना आजारी पडलो आणि विज्ञान विषयात नापास झालो. माझ्या या निकालामुळे माझ्या वडिलांच्या मनावर गंभीर परिणाम झाला आणि त्यांचा माझ्यावरील विश्वास उडाला. मला दहावीमधे चांगला अभ्यास करून वडिलांचा विश्वास मिळवायचा होता. पण त्याच वेळेस करोनामुळे टाळेबंदी लागली. ऑनलाईन अभ्यासासाठी वडिलांनी आर्थिक तंगीतही स्मार्टफोन घेऊन दिला. सतत हातात फोन असल्यामुळे मला गेमची सवय लागली आणि त्याचा परिणाम माझ्या दहावीतील निकालावर झाला, असे सोहमने सांगितले.

हेही वाचा – “श्रीकांत शिंदेंनी हल्ल्याची सुपारी दिली”, संजय राऊतांच्या आरोपावर शिंदे गटाचा हल्लाबोल; म्हणे, “मांडवली बादशाह…!”

सोहम पुढे म्हणाला की, तालुक्याला अकरावीत प्रवेश घेतला. इंजिनियर बनण्याचे स्वप्न होते, पण शैक्षणिक सुविधांचा अभाव, आर्थिक अडचणी होत्या. त्यावेळी मित्रांकडून जेईई मेन्स प्रशिक्षण योजनेबद्दल माहिती मिळाली आणि प्रवेश घेतला. महाज्योतीच्या प्रशिक्षकांनी अभ्यासात गोडी निर्माण केली. अभ्यास करण्यास भाग पाडले. सराव चाचण्या घेतल्या. प्रत्येक शंकेचे निरसन केले. जेईई देण्यास वडिलांचा विरोध होता. अभियांत्रिकीचा खर्च झेपणार नाही म्हणाले. परंतु, आईच्या पुढाकाराने अर्ज भरला. परीक्षा दिली आणि अपेक्षेपेक्षा अधिक चांगला निकाल लागला. आता आपण देशातील उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियरिंग करणार, असे त्याने सांगितले. सोहमच्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soham avinash raut from yavatmal cleared jee mains with 96 percentile nrp 78 ssb