scorecardresearch

“श्रीकांत शिंदेंनी हल्ल्याची सुपारी दिली”, संजय राऊतांच्या आरोपावर शिंदे गटाचा हल्लाबोल; म्हणे, “मांडवली बादशाह…!”

“संजय राऊत यांचं डोकं फिरलंय. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. आमच्या ठाण्यातल्या मानसिक रुग्णालयात त्यांचा उपचार आम्ही करू!”

sanjay raut letter devendra fadnavis
संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र, शिंदे गटाचं राऊतांवर टीकास्र (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ठाण्यातल्या एका गुंडाला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी श्रीकांत शिंदेंनी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून राऊतांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

काय आरोप आहे संजय राऊतांचा?

संजय राऊतांनी यासंदर्भात थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली आहे. “गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माझी सुरक्षा हटवण्यात आली. लोकप्रतिनिधींना सुरक्षा हा सरकारचा विषय आहे. गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात. पण एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे.सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहाता हा विषय आपल्या निदर्शनास आणणं आवश्यक आहे”, असं राऊतांनी पत्रात नमूद केलं आहे.

शिंदे गटाची खोचक टीका

दरम्यान, संजय राऊतांच्या या आरोपांवर शिंदे गटाकडून खोचक शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “संजय राऊत यांचं डोकं फिरलंय. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. आमच्या ठाण्यातल्या मानसिक रुग्णालयात त्यांचा उपचार आम्ही करू. फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध टीका करायची आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचं असं त्यांचं धोरण आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) उरलेल्या मंडळींबद्दल सहानुभूतीचं वातावरण तयार करायचं यासाठी ते असे उद्योग करत आहेत”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीव्ही ९ शी बोलताना दिली.

संजय राऊतांचा गंभीर आरोप; फडणवीसांना लिहिले पत्र; म्हणाले, “एक कुख्यात गुंड…”

“त्यांच्या कुटुंबाबद्दल ‘मांडवली बादशाह’ असं बोललं जातं”

“संजय राऊत सकाळी एक बोलतात, दुपारी एक बोलतात आणि संध्याकाळी एक बोलतात. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची अशी दशा होण्यामागे संजय राऊत आहेत अशी चर्चा उरलेल्या सैनिकांमध्ये दबक्या आवाजात आहे. त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते अशी वक्तव्य करत आहेत. संजय राऊत, सुनील राऊत कायम गुंड टोळ्यांच्या संपर्कात असतात. ‘मांडवली बादशाह’ असं त्यांच्या कुटुंबीयांबद्दल बोललं जातं. ते सकाळी माध्यमांशी बोलतात तेव्हा त्यांच्या पाठीमागे उभी असलेली माणसं पाहा. त्यांचा पूर्वेतिहास पाहा. पोलीस स्थानकात त्यांच्या असलेल्या नोंदी पाहा. त्यामुळे स्वत: काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगड मारण्याचा ते प्रयत्न करत आहेत”, असंही नरेश म्हस्के म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 17:01 IST