नागपूर: आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंग महारुद्र पूजा आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत महा सत्संग नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. बुधवार १० सप्टेंबरला सायंकाळी हा कार्यक्रम मलकापूर येथील क्रीडा संकुलावर सुरू झालेला आहे. या कार्यक्रमासाठी श्री श्री रविशंकर नागपुरात आले असता त्यांनी विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर दुःख व्यक्त केले. तसेच अनेक शंकाही उपस्थित केल्या. याशिवाय त्यांनी विविध विषयावर माहिती दिली.
विदर्भात शेतकऱ्यांचा आत्महत्या अजूनही सुरू आहेत. शेतकऱ्यांचे आत्मबल क्षीण होत आहे, यापूर्वी अनेक अडचणीतून आपण मार्ग काढला आहे. काही वर्षांपूर्वी ३७० गावागावांत पदयात्रा काढली. १० वर्षांनंतर पुन्हा पदयात्रा काढण्याची वेळ आली आहे, असे मत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केलंय. आजपासून ते पुढील तीन दिवस नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते महारुद्र पूजन, विज्ञान भैरव यांसारख्या शिबिरांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी, व्यापारी सर्वांना अध्यात्म आत्मबलाची गरज आहे, त्यासाठीच तीन दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे मत त्यांनी व्यक्त केलंय.
श्री श्री रविशंकर सोमनाथ ज्योतिर्लिंगचे महारुद्र पूजन करणार आहेत. ते सोमनाथ ज्योतिर्लिंगासोबत घेऊन आले आहेत. एक हजार वर्षांपूर्वी सोमनाथ ज्योतिर्लिंग उद्ध्वस्त झाले होते, त्याची पिंड लोक दक्षिण भारतात घेऊन गेलेले होते, ते पिंड आज नागपूरला आणण्यात आलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना सोमनाथ ज्योतिर्लिंगचे दर्शन घेता येईल. आध्यात्मिक मार्गावर चालावे आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा, आत्महत्या सारखा निर्णय घेऊ नये, असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी केले आहे.
नेपाळ हिंसाचारात षडयंत्र असू शकते
नेपाळच्या लोकांच्या संपर्कात आहे. युवकांमध्ये नैराश्य वाढत चालले आहे, जेव्हा कुठे आंदोलन होते, तेव्हा असामाजिक तत्त्व त्यात घुसतात, यात आंतरराष्ट्रीय षडयंत्रसुद्धा असू शकते. श्री श्री रविशंकर लवकरच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. या संदर्भात ते म्हणालेत की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी शभर वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे मी आनंदित आहे. शिवाय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा वाढदिवससुद्धा आहे, त्यामुळे भेट घेणार असल्याचं ते म्हणाले आहेत.