गोंदिया : पूर्वी फ्लाय बिग कंपनीतर्फे गोंदिया ते इंदूर विमानसेवा सुरू होती. मात्र फ्लायबिगने सेवा बंद केली होती. ती सेवा आता स्टार एअर कंपनीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याकरिता कंपनीतर्फे पुढील ६ महिन्यांचे वेळापत्रकही जाहीर केले, कमी तिकीट दरात सुरक्षित प्रवासाची हमी देण्यात आली असून येत्या १६ सप्टेंबर २०२५ पासून गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळावरून स्टार एअरचे विमान इंदूरसाठी ‘टेक ऑफ’ घेणार आहे.

सध्या बिरसी विमानतळा वरून इंडिगो एअरलाइन्सने आठवड्यातून दोनदा हैदराबादला नियमित उड्डाणे सुरू केली आहेत, हजारो प्रवासी या सेवेचा लाभ घेत असून हैदराबादमार्गे मुंबई, दिल्लीसारख्या शहरात प्रवासी जात आहेत. या पूर्वी ही फ्लाय बिग एअरलाइन्स कंपनीने गोंदिया ते इंदूर विमानसेवा सुरू केली होती. मात्र वारंवार विमानसेवेत विघ्न येत होते. परिणामी कंपनीने ती सेवा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. ती बंद झालेली फेरी आता फ्लायबिग ऐवजी स्टार एअर एअर कंपनीने पुन्हा सुरू करणार आहे. सद्यस्थितीत गोंदिया विमानतळावरून इंडिगो कडून गोंदिया हैदराबाद विमानसेवा नियमितपणे सुरू आहे.

इंदूरच्या देवीअहिल्याबाई होळकर विमानतळावरून पुढील ६ महिन्यांसाठी वेळापत्रक जारी केले आहे. या काळात विमानतळा वरून १०० उड्डाणे होतील. स्टार एअरतर्फे गोंदियासाठी १६ सप्टेंबर अशी उड्डाणाची तारीख ही निश्चित करण्यात आली आहे . या उड्डाणाची तिकीट बुकिंग प्रक्रियाही सुरू केली आहे. स्टार एअरने त्यांच्या वेळापत्रकात गोंदिया-इंदूर वेळापत्रक निश्चित केले. ज्यामध्ये गोंदिया-इंदूर भाडे १,४९९ रुपयांपासून सुरू होते. हे उड्डाण आठवड्यातून ३ दिवस राहणार आहेत. त्यात मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी सेवा सुरू असणार आहे. गोंदियाच्या बिरसी विमानतळाचे विमानतळ अधिकारी गिरीशचंद्र वर्मा यांनी ही माहिती दिली आहे.

अशी असणार सेवा

प्रवासी विमानसेवा १६ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार असून आठवडयातील मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी विमान प्रवास करता येणार आहे. इंदूर वरून गोंदियाला येण्यासाठी सायंकाळी ५ वाजता उड्डाण भरणार असून गोंदिया विमानतळावर ५.५५ वाजता पोहोचणार आहे. तसेच गोंदिया विमानतळावरून सकाळी ६.२५ वाजता विमान सुटणार असून इंदूर विमानतळावर ७.२० वाजता पोहोचणार आहे.

ऑनलाइन बुकिंगचीही सोय

गोंदिया ते इंदूर आणि इंदूर ते गोंदिया विमान प्रवासाची सुरुवात होत असल्याने विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी स्टार एअर कंपनीच्या निर्णयाचे स्वागत केले. तिकिटांची आगावू बुकिंग सुरू करण्यात आली. विमानतळासह स्टार एअर वेबसाइटवरदेखील तिकिटांची बुकिंग उपलब्ध करण्यात आली आहे.