अकोला : सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांवरील बुटफेक प्रकरणी अकोल्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सोमवारी सायंकाळी बसस्थानक चौकात काळे झेंडे दाखवत जोरदार निदर्शने करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयामध्ये देशाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर बुट फेकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. यावेळी सरन्यायाधीश एका प्रकरणाची सुनावणी घेत होते. ६० वर्षीय वकील राकेश किशोर यांनी हा प्रकार केला. सुरक्षारक्षकांनी तत्परतेने आरोपीला पकडले. यावेळी आरोपी घोषणाबाजी करीत ‘सनातन धर्माचा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाही’ असे म्हणत होता.

दरम्यान, या घटनेचे पडसाद अकोल्यात उमटले आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. देशात विपरीत परिस्थिती निर्माण केली जात आहे. देशातील वातावरण दूषित करण्याचा हा डाव आहे. देशाचे सरन्यायाधीशांला अशी वागणूक दिली जात असले तर, हा भारतीय लोकशाहीसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरणार आहे. भारताच्या इतिहासात अशा प्रकारची घटना कधीच घडली नव्हती. या कृत्याची कठोर शब्दांत निषेध करीत असल्याचे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले. न्यायपालिका देशाची सर्वोच्च संस्था आहे. त्याबद्दल असा अनादर सहन केला जाऊ शकत नाही. समाजात शांतता, सद्भावना आणि संविधानाचा सन्मान राखण्याचे आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात आले.

या घटनेच्या विरोधात मदनलाल धिंग्रा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महानगरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी घटनेच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. यावेळी महानगराध्यक्ष रफीक सिद्दिकी, प्रदेश संगठक सचिव जावेद जकरिया, कार्याध्यक्ष देवानंद टाले, युसूफ अली, पश्चिम विधानसभा अध्यक्ष मेहमूद खान पठाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील वनारे, मिलिंद गवई, पापाचंद पवार, ॲड. संदीप तायडे, बाबासाहेब घुमरे, आनंद वेराळे, शेख रमजान, अन्सार अली, मोहम्मद साफिक, रजिक इंजिनियर, अल्ताफ खान, मो सानिफ, चंदू चांदखां, उमेश खंडारे, नरेंद्र देशमुख, रेहान सिद्दिकी, शाहीद सिद्दीकी, भाऊराव साबळे, वसीम खान, रमेश नाईक, सोहेल खातीब, अमन घरडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनामुळे बसस्थानक चौकातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.