मॅन ऑफ द ईअर पुरस्काराने गौरवांकित होत असतांना राज्यात १ जुलैला लोकसहभागातून लावण्यात आलेल्या २ कोटी ८२ लाख वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची नोंद घेतल्याचे ”लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड” चे प्रमाणपत्रही आजच मिळाले. या दोन्ही गोष्टी खूप आनंददायी असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल मरीन लाईन्सच्या वतीने रविवारी पद्मविभूषण डॉ.बी.के. गोयल यांच्या हस्ते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मॅन ऑफ द ईअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वुमन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित झालेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम, जेसीचे संस्थापक चेअरमन जीवराज शहा, इंदर जैन, प्रेम लुनावत यांच्यासह जेसीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात डॉ. सुजाता वासानी आणि डॉ. अमितकुमार शर्मा यांना आऊटस्टॅंडिंग यंग पर्सन अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ लाख ५२ हजार लोकांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, माणसाला श्वासासाठी लागणारा प्राणवायू झाडापासून मिळत असल्याने वृक्ष लागवड हे प्रत्येकाच्या जीवनाचे कर्तव्य झाले पाहिजे. येत्या तीन वर्षांत राज्यात ५० कोटी झाडे लावण्याचा शासनाचा संकल्प असून येणाऱ्या १ जुलै २०१७ च्या ३ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात जेसीने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याआधी ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनलतर्फे दिवं. प्रमोद महाजन, दिवं. आर.आर. पाटील, महानायक अमिताभ बच्चन, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सन्मानित करण्यात आले होते.