लोकसत्ता टीम

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक रॅलीतील भाषणामुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत असलेले भाजपचे उमेदवार तथा वन व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तरादाखल यापुढेही आपण याच पद्धतीने काँगेसविरोधात बोलत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मी काँग्रेसच्या हुकूमशाहीला घाबरणारा नाही, असे सांगतानाच १९८४ च्या दंगलीत कशाप्रकारे अत्याचार झाले, याची आठवण त्यांनी करून दिली आहे.

चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या निवडणूक प्रचारासाठी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात जाहीर सभा झाली. पंतप्रधान मोदी यांचे सभा मंचावर आगमन होण्यापूर्वी मुनगंटीवार यांचे भाषण झाले. यावेळी मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना काही शब्द आणि वाक्ये वापरली, ज्यामुळे सर्व श्रोते अवाक झाले. मुनगंटीवार यांच्या भाषणाची ही क्लिप ज्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल झाली, त्याच वेगाने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रियांचा फेरा सुरू झाला. लोकांनी मुनगंटीवार यांच्या भाषणाचा निषेध केला आणि ते अत्यंत असभ्य, असंस्कृत असल्याची टीका केली.

आणखी वाचा-“नवरा-बायकोमध्‍ये भांडण लावू नका,” नवनीत राणांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला

सोशल मीडियावरील टीकेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी या दुष्टचक्राला आपण घाबरत नसून काँग्रेसच्या हुकूमशाही विरोधात याच पद्धतीने बोलत राहणार असल्याचे स्पष्टीकरण फेसबुक पेजवर दिले आहे. जेव्हा लोकांना १९८४ मधील दंगलीतील अत्याचाराची आठवण येते तेव्हा खूप चीड येते. आपल्या भाषणाची अर्धवट क्लिप व्हायरल करून काँग्रेसने जनतेवर केलेला अन्याय आणि अत्याचार लोक लपवू शकणार नाहीत. १९८४ च्या दंगलीत असा अत्याचार झाला नव्हता, याचे उत्तर कोणताही काँग्रेस नेता अभिमानाने देऊ शकत नाही. काँग्रेसच्या हुकूमशाही कारभाराविरोधात नेहमीच बोलणार, असे मुनगंटीवार यांनी त्यात नमूद केले आहे.