अमरावती: येत्या ४ डिसेंबर रोजी पौर्णिमेच्या दिवशी ‘सुपरमून’ दिसणार आहे. या दिवशी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर कमी राहील. त्यामुळे चंद्र या दिवशी मोठा व प्रकाशमान दिसेल. सरासरी पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ८५ हजार कि.मी. असते. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ७० हजार कि. मी. च्या आत असते, त्यावेळी ‘सुपरमून’ची स्थिती येते.
चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. पृथ्वीवरुन आपण नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहतो. चंद्रावरुन पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते, चंद्रावरुन पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेकंद लागतात.
चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ सें.मी. लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल. चंद्रावर ३० हजार विवरे व १२ पर्वत आहे. पर्वत व विवरे दुर्बिनीमधून अगदी चांगल्या प्रकारे पाहता येतात. ४ डिसेंबर ला संध्याकाळी दिसणारा सूपरमून खगोलप्रेमींनी आणि जिज्ञासूंनी अवश्य बघावा. हा सुपरमून अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येईल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रविण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी दिली आहे.
सुपरमून म्हणजे काय?
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. अशावेळी चंद्रबिंब चौदा पट मोठे व तीस टक्के जास्त प्रकाशित दिसते. पूर्ण चंद्र आपल्या नेहमीच्या आकारापेक्षा थोडा अधिक मोठा आणि तेजस्वी दिसतो. यावर्षी ७ ऑक्टोबर, ५ नोव्हेंबरला ‘सुपरमून’चे आकर्षक दृश्य पाहण्याची संधी मिळाली होती.
चंद्र पृथ्वीभोवती फिरताना त्याची कक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार असते. त्यामुळे काही वेळा चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो. त्यावेळी पूर्ण चंद्राच्या अवस्थेत तो सुमारे ३० टक्के तेजस्वी दिसतो. ४ डिसेंबर २०२५ च्या रात्री आकाश स्वच्छ असेल तर पूर्ण चंद्र अधिक मोठा, उजळ आणि मनमोहक स्वरूपात झळकताना दिसेल.
खगोलप्रेमी आणि आकाश निरीक्षकांसाठी हा क्षण म्हणजे एक आनंदाचा उत्सव ठरणार आहे. अशा वेळी दुर्बिणी किंवा कॅमेऱ्याच्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरे (क्रेटर्स) आणि रेषा (मारीआ) अधिक स्पष्टपणे दिसू शकतात. त्यामुळे सुपरमूनचा हा जादुई प्रकाशोत्सव निसर्गाचा अनोखा चमत्कार ठरणार असल्याने खगोलअभ्यासक रात्रीच्या आकाशात नजर लावून राहाणार आहेत.
