नागपूर : विवाहित महिलेला सासरच्या मंडळीकडून ‘माहेरून पैसे आण’ असे सांगणे म्हणजे विवाहितेचा शारीरिक छळ होतो काय? याबाबत नागपूरमधील एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह तीन सदस्यीय खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. सरन्यायाधीशांनी याप्रकरणात महत्वाचा निकाल दिला.
बजाज नगर पाेलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिलेचा विवाह जुलै २०२१ राेजी झाला हाेता. दाेन्ही कुटुंबियांच्या आणि नातेवाईकांच्या संमतीने हा विवाह झाला हाेता. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांनंतर सासू-सासरे आणि ननंद यांनी विवाहितेला माहेरुन पैसे आणण्याचा तगादा लावला. वारंवार पैसे आणि नवीन कपडे आणण्यावरुन तिला टाेमणे मारत हाेते. त्यामुळे विवाहितेने आपल्या पतीला ही बाब सांगितली. तर त्याने सर्व कुटुंबियांसमाेर तिचा पानऊतारा केला हाेता. तिला सर्वांसमाेर अपमानित केले. त्यानंतर पतीला तिला मारहाण करणे आणि शिवीगाळ करणे सुरु केले. काही दिवसांनंतर त्याने पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी केली. तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतरही तिच्या सासरच्यांनी हुंड्याच्या भेटवस्तूंची मागणी सुरूच ठेवली. सासरच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून महिला माहेरी निघून गेली. महिलेने माहेरी गेल्यानंतर सासरच्या मंडळीविरोधात फेब्रुवारी २०२२ राेजी बजानगर पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिने तिच्या पतीवर अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर आराेपही केला.
न्यायालयाचा निर्णय काय?
याप्रकरणी उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याचा अर्ज फेटाळल्यानंतर आराेपी पती व त्याच्या नातेवाईकांनी सर्वाेच्च न्यायालयात अपील दाखल केले. एखाद्या विवाहितेला ‘माहेरुन पैसे आण’ असे म्हणने म्हणजे विवाहितेचा शारीरिक छळ करण्याच्या कक्षेत येत नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण सर्वाेच्च न्यायालयाने नाेंदवून कलम ४९८ (अ) अंतर्गत दाखल गुन्ह्यातून सासू-सासरे आणि ननदची मुक्तता केली. मात्र, पतीविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा रद्द करण्यात नकार देऊन ताे गुन्हा कायम ठेवला. सरन्यायाधीश भूषण गवई, न्या. विनाेद चंद्रन आणि न्या. अतुल चांदुरकर यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमाेर या प्रकरणाची सुनावणी झाली. सासू, सासरे आणि नणंदेविरुद्ध काेणतेही ठाेस पुरावे नाही. फक्त ‘माहेरून कपडे आणि पैसे आण‘ असे म्हटल्याचा आराेप असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि तिघांवरील गुन्हा रद्द करण्याचे निर्देश दिले तसेच पतीवरील गुन्हा कायम ठेवला.