नागपूर : ताडोबातील वाघ माणसाळलेले आहेत. त्यांना ना आता जिप्सीची भीती वाटते, ना त्यातील पर्यटकांची. म्हणूनच ते अगदी सहजपणे जिप्सीजवळ येतात. कधी चक्कर मारतात, कधी आरसा चाटतात, तर कधी सायलेंसर चाटतात. मात्र, यातूनच एखादेवेळी पर्यटकांवर वाघाने हल्ला केला तर ताडोबा व्यवस्थापन त्याची जबाबदारी घेणार का, असा प्रश्न दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील नवेगाव क्षेत्रात एक वाघीण पर्यटक जिप्सीच्या अगदी जवळ आली आणि तीने जिप्सीच्या सायलेंसरला चाटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायलेंसर गरम असल्याने ती तात्काळ बाजूला झाली. यास्थितीत वाघीण आक्रमक झाली असती आणि तिने जिप्सीतील पर्यटकांवर हल्ला केला असता तर काय? याची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली असती का? ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पच नाही तर उमरेड-करांडला अभयारण्यात देखील यापूर्वीदेखील अशा घटना घडल्या आहेत.

हेही वाचा – बुलाढाणा : नात्याला काळिमा, काकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हेही वाचा – बुलढाणा जिल्ह्यात धुक्याचे साम्राज्य; रब्बी पिकांना बसणार फटका, शेतकरी चिंतेत

वाघ जिप्सीच्या जवळ येणे. जिप्सीचा आरसा चाटणे, जिप्सीच्या भोवताल फिरणे हे प्रकार गेल्या काही वर्षांत सातत्याने घडत आहेत. काही वर्षांपूर्वी एका वाघिणीने या जिप्सीवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला होता. या सर्व घटना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील अनियंत्रित पर्यटनाची साक्ष देणाऱ्या आहेत. विदेशातच नव्हे तर, शेजारच्या मध्यप्रदेशातदेखील पर्यटनाचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. वाघापासून जिप्सीचे अंतर किमान ३० मीटर असणे आवश्यक आहे. वाघ चालून येत असेल तर त्याचवेळी जलदगतीने ते वाहन मागे घेणे ही जबाबदारी वाहनचालक व त्यातील पर्यटक मार्गदर्शकाची आहे. मात्र, बरेचदा पर्यटकांकडून मिळणाऱ्या अतिरिक्त पैश्याला ते बळी पडतात आणि वाघाच्या पाठोपाठ जिप्सी नेतात. अशावेळी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अतिपर्यटनामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.

घटनेची सत्यता शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत – डॉ. जितेंद्र रामगावकर

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील नवेगाव क्षेत्रात एक वाघीण पर्यटक जिप्सीच्या अगदी जवळ आली आणि तीने जिप्सीच्या सायलेंसरला चाटण्याचा प्रयत्न केला. यावर घटनेची सत्यता शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tadoba tiger comes towards gypsy if something happens tadoba administration will take responsibility rgc 76 ssb
First published on: 27-01-2023 at 15:28 IST