उद्या मतदान अन् भाजपचे आमदार समीर कुणावार ‘अदृश्य’! | Teacher constituency Voting tomorrow and BJP MLA Sameer Kunawar not active Pmd 64 ysh 95 | Loksatta

उद्या मतदान अन् भाजपचे आमदार समीर कुणावार ‘गायब’!, भाजप समर्थित नागो गाणार गटाला हादरा

शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून घोषित झालेले व नंतर भाजपचा जाहीर पाठिंबा मिळालेले नागो गाणार लढतीत आहेत.

MLA Sameer Kunawar
आमदार समीर कुणावार (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रशांत देशमुख

वर्धा : शिक्षक मतदारसंघासाठी उद्या सोमवारी मतदान असताना जबाबदारी देण्यात आलेले भाजपचे आमदार समीर कुणावार हे ‘अदृश्य’ झाल्याने भाजप समर्थित नागो गाणार गट हादरून गेला आहे. शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून घोषित झालेले व नंतर भाजपचा जाहीर पाठिंबा मिळालेले नागो गाणार लढतीत आहेत. शिक्षक परिषदेत गाणार यांच्या उमेदवारीबाबत नाराजी होती. त्यामुळे विविध गट अप्रत्यक्ष विरोधात गेल्याचे पाहून भाजप श्रेष्ठींनी गाणारांची उमेदवारी आपल्या खांद्यावर घेतली.

भाजपच्या सहाही जिल्ह्यातील आमदारांना कामास लावण्यात आले. हिंगणघाटमध्ये समीर कुणावार यांच्यावर जबाबदारी असताना ते शनिवारी सायंकाळपासून दिसेनासे झाले आहे. पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह ते बाहेरगावी निघून गेल्याची चर्चा आहे. ९० पदाधिकाऱ्यांसह पंढरपूरला गेल्याची एकाने माहिती दिली. शनिवारी सायंकाळी भाजप नेते डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी वर्धेत निवडणूकविषयक सभा घेतली. त्यात कुणावार गैरहजर पाहून कोठेकर चांगलेच नाराज झाल्याची माहिती मिळाली. हिंगणघाटला गाणार ‘कोरे’ राहू नये म्हणून खासदार रामदास तडस व माजी खासदार सुरेश वाघमारे यांना तंबू सांभाळण्याची जबाबदारी मिळाली.

हिंगणघाटला असणारे खा. तडस कुणावारविषयी विचारणा केल्यावर म्हणाले, की वेळेवर असे वागणे बरे नव्हे. आम्ही सर्व ते प्रयत्न करीत आहोेत. तर जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी कुणावार पंढरपूरला गेल्याचे मान्य करीत इतरांवर जबाबदारी सोपवली असल्याचे नमूद केले. आ. कुणावार यांच्या नाराजीचे कारण कळले नाही. गाणार यांच्यावर व्यक्तिगत असलेल्या नाराजीपोटी भाजप श्रेष्ठींनी त्यांची जबाबदारी आमदारांवर टाकली. मात्र, आमदार असे नाराज असल्यास गाणार यांचा ‘संदीप जोशी’ होऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहे. याविषयी वारंवार प्रयत्न करूनही आमदार कुणावार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 17:10 IST
Next Story
वाशीम: शिवसेनेत अंतर्गत धुसफूस! वाशीम जिल्ह्यात नवनिर्वाचित जिल्हा प्रमुखांच्या नियुक्तीमुळे नाराजी