वर्धा : मराठी साहित्य संमेलनाचा अपेक्षित खर्च अडीच ते तीन कोटी रुपये आहे. मात्र, हाताशी शासनाकडून आलेले अवघे २५ लाख रुपये असल्याने आयोजकांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत आहे. ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन ३, ४ व ५ फेब्रुवारी रोजी वर्धेत करण्यात आले आहे. तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येते. याच अनुषंगाने स्थानिक आयोजकांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संमेलनाच्या एकूण खर्चाबाबत अद्याप वाच्यता न झाल्याच्या पार्श्वभूमीवर सदर प्रतिनिधीने खर्चाचा आकडा विचारला. थोड्या शांततेनंतर संमेलनाचे कार्यवाह प्रदीप दाते म्हणाले की, अडीच ते तीन कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. शासनाकडून मंजूर ५० लाख रुपयांपैकी २५ लाख रुपये महामंडळाकडे आले आहेत. जुळवाजुळव सुरू असल्याचे ते म्हणाले. शासनाने मंजूर केलेल्या दीड कोटी रुपयाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी नंतर लोकसत्तास सांगितले. लोकवर्गणीतून फार भरीव रक्कम जमा होण्याची अपेक्षा नसल्याचे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले.

हेही वाचा >>> संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन

गझल व काव्य सादरीकरणासाठी फार मोठा प्रतिसाद आला. पण त्यापैकी केवळ पाचशे कवींची निवड झाली असून दोन टप्प्यात कवी संमेलन होणार असल्याचे संजय इंगळे तिगावकर म्हणाले. प्रतिनिधी शुल्क संमेलनाच्या संपूर्ण कालावधीसाठी चार हजार रुपये तर एका दिवसासाठी दोन हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तीनही दिवस निवास सोडून जेवण व नास्ता पाहिजे असल्यास दोन हजार रुपये आकारले जाणार आहे. ठराविक दिवशीच जेवण हवे असल्यास पैसे मोजून कुपन घ्यावे लागेल.

हेही वाचा >>> विद्रोही मराठी साहित्य संमेलन : मंडप उभारणीची सुरुवात बळीराजाच्या नांगरणीद्वारे

पत्रिकेत नमूद कार्यक्रमात झालेला बदल सांगताना अनिल गडेकर म्हणाले की शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे समारोपाऐवजी आता उद्घाटन सत्रात उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उद्घाटन व समारोप अशा दोन्ही सत्रात हजर राहणार आन्त. माजी संमेलनाध्यक्षानांही निमंत्रण देण्यात आले आहे. त्यापैकी वसंत आबाजी डहाके व अक्षयकुमार काळे यांचा होकार तूर्तास आला आहे. विविध माध्यमांचे किती प्रतिनिधी येणार याचा अंतिम आकडा अद्याप निश्चित झालेला नाही. सध्या ७० प्रतिनिधींची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. दिल्ली, मुंबईतून सध्या विचारणा सुरू आहे. या सर्व प्रतिनिधींची व्यवस्था संमेलन स्थळालगतच स्वाध्याय मंदिरात करण्यात आल्याचे जिल्हा माहिती अधिकारी वरकड यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The expected cost marathi literature program vardha two and a half to three crores pmd 64 ysh