नागपूर : शहरात अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यात मृत आणि जखमींच्या संख्येतही वाढ झाली आहे. कानाला मोबाईल लावून वाहन चालविणे, हेसुद्धा अपघाताचे मुख्य कारण असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. पोलिसांनी गेल्या १५ महिन्यांत वाहन चालविताना मोबाईल वापरणाऱ्या १२ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, आता हेडफोन, ब्ल्यूटूथ लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्था ताळ्यावर आणण्यासाठी पोलिसांनी विविध मोहीम आणि उपक्रम सुरु केले आहेत. राज्यात गेल्या वर्षी ३६ हजारांवर रस्ते अपघात झाले असून १५ हजार ३३५ जणांचा अपघातात मृत्यू झाला. अपघाताच्या मुख्य कारणांमध्ये भरधाव वाहने चालविणे, सिग्नल तोडणे आणि कानाला मोबाईल लावून वाहन चालविणे या कारणांचा समावेश आहे. त्यामुळे राज्य सरकारने कानाला मोबाईल लावून किंवा कानात हेडफोन कानाला लावून गाणी, रिल्स, यु-ट्यूबवरील चित्रफिती ऐकत वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेकदा कानातील हेडफोनमुळे मागून भरधाव आलेल्या वाहनांचा वाजलेला ‘हॉर्न’ ऐकू येत नाही.
त्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो. वाहतूक पोलिसांनी वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. वर्ष २०२३ मध्ये ६ हजार ४१० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्यामुळे वचक बसून वाहन चालविताना मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या कमी होईल असे वाटत होते. मात्र, याउलट २०२४ मध्ये ९ हजार २५५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत २४४५ वाहनचालकांची वाढ झाली. यावर्षी २०२५ (मार्च) मध्ये २६६३ मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. अशा वाहनचालकांकडून घसघशीत दंडही वसूल करण्यात आला.
बंगळुरु शहरात सर्वाधिक कारवाई
कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहरात वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांची संख्या सर्वाधिक आहे. जवळपास ३३ टक्के लोकांनी रस्त्यावर गाडी चालवताना फोनवर बोलत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक कोलकता (३१ टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई (२४ टक्के) तर दिल्लीमध्ये अशा लोकांची संख्या जवळपास २१ टक्के आहे, असल्याची आकडेवारी एका सर्वेक्षणातून समोर आली.
मोबाईल बोलताना वाहन चालविणे जीवावर बेतू शकते किंवा अपघाताचे कारण ठरु शकते. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हा गुन्हा आहे. अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. – माधुरी बाविस्कर (सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग.