अकोला : जनावरांमधील ‘लम्पी’ आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील विविध भागात ‘लम्पी’ग्रस्त जनावरे आढळून आले. दुधावर परिणाम होत नाही ना? अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली. अकोला, नांदखेड, भिकूनखेड व गाजीपूर येथील जनावरांत ‘लम्पी’ त्वचा आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल पुणे येथील पशुसंवर्धन रोग व अन्वेषण सहआयुक्त कार्यालयाने दिला. त्यानुसार ही गावे नियंत्रित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली असून, या क्षेत्रातील गुरांचे बाजार, वाहतूक व इतर बाबींवर मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला. ‘लम्पी’ आजाराने असंख्य जनावरे बाधित होत आहेत. अकोला, अकोट तालुक्यातील नांदखेड, बाळापूर तालुक्यातील भिकूनखेड व मूर्तिजापूर तालुक्यातील गाजीपूर येथील जनावरांत लम्पी’ या त्वचा आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानुसार संसर्ग केंद्रापासून १० कि.मी. बाधित क्षेत्र व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. नियंत्रित क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. गुरे, म्हशी प्रजातीचे प्राणी अन्यत्र किंवा नियंत्रित क्षेत्राबाहेर नेण्या-आणण्यास मनाई करण्यात आली आहे. गोजातीय प्रजातीचे जिवंत अथवा मृत प्राणी कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आलेली वैरण, साहित्य, कातडी, प्राण्यापासूनचे अन्य उत्पादन नियंत्रित क्षेत्रातून बाहेर नेण्यास मनाई घालण्यात आली आहे.
नियंत्रित क्षेत्रात गुरांचे बाजार, शर्यती, जत्रा, प्रदर्शन यांना मनाई आहे. परिसरात किटक निर्मूलनासाठी स्वच्छता, फवारणीचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. बाधित जनावर मृत झाल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. निरोगी जनावरांना बाधा होऊ नये म्हणून ती वेगळी ठेवावीत. पशुंना आवश्यकतेनुसार प्रतिजैविके द्यावीत. बाधित क्षेत्राच्या पाच किमी अंतरातील गो व महिषवर्गीय पशुंना गॉट पॉक्स लस द्यावी, आदी आदेश देण्यात आले आहेत.
‘लम्पी’ आजाराची ही आहेत लक्षणे
‘लम्पी’ त्वचा रोग हा गोवंश आणि म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. आजाराची देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याचे प्रमाण अधिक असते. ‘लम्पी’मुळे सर्वसामान्यपणे १०-२० टक्के, तर मृत्यूदर एक-पाच टक्केपर्यंत आढळून येतो. आजारामुळे जनावरे अशक्त होतात. त्यांचे दुग्ध उत्पादन घटते. ‘लम्पी’ रोग हा जनावरांपासून माणसामध्ये संक्रमित होत नसल्याने मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही.