बुलढाणा : विविध घटनांनी बीड जिल्ह्याचे नाव अख्ख्या महाराष्ट्र राज्यात गाजत आहे. याच बीड जिल्ह्यातील तीन युवकांनी थेट विदर्भातील मलकापूर (जि. बुलढाणा) शहरातील एका अल्पवयीन युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न केला. त्यांनी मलकापूर येथून त्या मुलीला चारचाकी वाहनात टाकून पळ काढला.

मात्र, मोताळा येथे या भरधाव कारचे टायर फुटल्याने त्यांचा धाडसी प्रयत्न फसला. त्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या हाती हे तिघे अपहरण कर्ते युवक अडकले. त्यांना मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिसांनी कार्यवाही करून अपहृत १६ वर्षीय युवतीची सुखरूप सुटका केली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील या तिघा अपहरण कर्त्यांना मलकापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपहृत युवतीची सुखरूप सुटका करण्यात आल्याने संभाव्य भीषण अनर्थ टळला आहे.

विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर ते मोताळा दरम्यान आज शुक्रवारी, १० ऑक्टोबर रोजी हा थरार रंगला. बोराखेडी (तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा ) पोलिसांनी केलेली केलेली नाकाबंदी तोडून या युवकांनी आपली कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला, पण कारचे टायर फुटल्याने त्यांचा प्रयत्न फसला. इम्रान सलीलोद्धीन सिद्धीकी (वय १७, रा. माजलगाव, जि.बीड), उमेद अब्दुल्ला पठाण ( १९ वर्षे, रा. माजलगाव) आणि शाकीर सय्यद वहाब ( १७ वर्षे, रा. माजलगाव, जि. बीड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी युवकांची नावे आहे. त्यांना मलकापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले

मोठा जमाव पोलीस ठाण्यात आल्याने तणाव

दरम्यान अल्पसंख्यांक समाजाच्या युवतीचे अपहरण करण्यात आल्याने मलकापूर व मोताळा तालुक्यात तणाव निर्माण झाला. बोराखेडी पोलिसांनी आरोपीना पोलीस ठाण्यात आणल्यावर मोठा जमाव पोलीस ठाण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, अपहरण कर्ते व अपहृत युवती एकाच धर्माचे असल्याचा उलगडा झाल्यावर आणि आरोपीना अटक केल्याने हा तणाव निवळला.