लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : उपराजधानीत ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने वारंवार हजेरी लावली आहे. अशातच गेल्या महिन्याभरात नागपुरातील वेगवेगळ्या भागात उष्माघाताचे तीन संशयित मृत्यू नोंदवले गेले आहे. परंतु, मृत्यू विश्लेषण अहवालातूनच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

नागपुरात भर उन्हाळ्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. जिल्ह्यातील बऱ्याच भागात अवकाळी पावसासह गारपिटीचीही नोंद होत आहे. त्यामुळे तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. दमट वातावरणाचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला नागपुरात उन्हाचा तडाखा वाढला होता.

आता अधूनमधून पाऊस पडत असतानाही शहरातील तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या वर आहे. त्यामुळे दुपारी उन्हामुळे उकाड्याने सगळे त्रस्त होत आहेत. दरम्यान गेल्या महिन्याभरात शहरातील वेगवेगळ्या भागात ३ बेघर नागरिक मृत्यू झालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळले. त्यांच्या मृत्यूची नोंद नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने उष्माघाताच्या संशयित मृत्यूमध्ये केली आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे तर दोघांचा मृतदेह इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पाठवण्यात आला आहे.

आणखी वाचा-सहा वर्षांत परदेशांत ४०३ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

या तिघांचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मृत्यू विश्लेषण समितीची बैठक घेतली जाईल. त्यात या मृत्यूंवर तज्ज्ञांकडून चर्चा करून हा मृत्यू उष्माघाताने वा इतर आजाराने झाला हे निश्चित केले जाईल. त्यामुळे या मृत्यूचे कारण काय निघणार? याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

लक्षणे काय?

डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे, बेशुद्ध पडणे, अशक्तपणा जाणवणे, नाडी असामान्य होणे यासह प्रौढ व्यक्तींमध्ये दिशाभूल, चिडचिड, गरम, लाल आणि कोरडी त्वचा, डोकेदुखी ही उष्माघाताची लक्षणे आढळतात. मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, अतिचिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी, तोंड कोरडे पडणे, शुष्क त्वचा आणि अश्रू न येणे, सुस्ती ही लक्षणे आढळतात.

आणखी वाचा-नागपूर-चंद्रपूर महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत मायलेकीसह ३ ठार

नागपूर महापालिकेचे म्हणणे काय?

नागपूर महापालिकेने उष्माघात नियंत्रणासाठी शहरातील विविध झोनमध्ये ३३८ पाणपोई, विविध उद्यानात १६७ पाणपोई, ४०० बेघरांची सोय होईल असे निवारागृह, महापालिकेच्या रुग्णालयांसह मेडिकल आणि मेयो या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये शीतवार्ड सुरू करून १०० रुग्णशय्येसह आवश्यक औषधांची सोय केल्याचेही नागपूर महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले.

प्रतिबंधात्मक उपाय

अतिउष्णतेच्या परिस्थितीत भरपूर ताजे व हलके अन्न खाल्ल्यानंतरच घराबाहेर पडा. फळे आणि सलाद पचायला हलके असते. ते खावे. पातळ, सैल, सुती, आरामदायी शक्यतो फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. उन्हात जाताना डोके झाकावे. भरपूर पाणी, ओ.आर. एस. पाण्याचे द्रावण, ताक किंवा लस्सी, लिंबूपाणी, पन्हा हे घरगुती पेय घ्यावे. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर यासारखी उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three suspected heat stroke deaths were reported in different parts of nagpur mnb 82 mrj