अमरावती : जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर एक तीन वर्षीय मुलगी सापडली होती. या मुलीला तिचे नावही सांगता येत नव्हते. त्या मुलीस ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. मुलगी सुखरूप मिळाल्याने अश्रू अनावर झालेल्या पालकांनी मंगरूळ चव्हाळा पोलिसांचे मनोमन आभार मानले. घटनेचे गांभीर्य ओळखून दाखवलेल्या तत्परतेबद्दल पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद समीर मोहम्मद शब्बीर हे शकूलपूर, गडवारा (उत्तर प्रदेश) येथे राहणारे गृहस्थ एका तीन वर्षीय लहान मुलीला घेऊन मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्यात पोहचले. समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जात असताना ही लहान मुलगी आम्हाला दिसली. तिला बोलता येत नव्हते, म्हणून आम्ही तिच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यात घेऊन आलो, असे मोहम्मद समीर यांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी या मुलीला महिला पोलिसांच्या मदतीने बोलते करण्याचा प्रयत्न केला. पण, तिला स्वत:चे नाव किंवा आई-वडिलांचे नाव सांगता येत नव्हते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधीकारी अशोक थोरात, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांना दिली.
पोलिसांनी समाज माध्यमांवर या मुलीचे छायाचित्र प्रसारीत केले. पोलीस पथकांनी आजूबाजूच्या परिसरात मुलीचे छायाचित्र दाखवून विचारपूस सुरू केली. मुलीच्या वेशभूषेवरून ती जडी-बुटीचा व्यवसाय करणाऱ्या भटक्या समुदायातील असावी, असा पोलिसांचा अंदाज होता. पोलीस शिवणी येथील टोल नाक्याजवळ शोध घेत असताना एक व्यक्ती ही लहान मुलीबाबत विचारपूस करताना दिसली.
माझी लहान मुलगी ही हरवलेली असल्याचे या व्यक्तीने सांगितले. पोलिसांनी या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांची लहान मुलीसोबत भेट घालून दिली. तिने मुलीला ओळखले. हीच माझी मुलगी रुद्राक्षी असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगर येथून वर्ध्याकडे जात असताना वाटेत वॉशरूमला जाण्यासाठी थांबलो. रुद्राक्षी ही गाडीतून केव्हा उतरली हे आम्हाला कळले नाही. आम्ही तिला सोबत न घेता गाडीतून निघालो.
वर्धा येथे पोहोचल्यावर गाडीत रुद्राक्षी नसल्याचे आमच्या लक्षात आले आणि तिचा शोध घेत आम्ही शिवणी टोलनाक्यावर पोहोचलो, असे तिच्या वडिलांनी सांगितले. ठाणेदार राजीव हाके, पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबूरकर, विलास सोळंके, पोलीस अंमलदार अमोल देशमुख, संजय रायबोले, उमेश धंदर, मंगेश लकडे, विशाल सोळंके आदींनी ही कामगिरी पार पाडली.