चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील भीमणी नदी पात्रात वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (१३ सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. मात्र, वनविभाग घटनास्थळापर्यंत येईपर्यंत वाघाचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. दरम्यान, वाघाच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहे.

अशातच पोंभूर्णा तालुक्यातील भीमणी नदीच्या पात्रात वाघाचा मृतदेह अनेकांना पाण्यावर तरंगतांना दिसला. तेव्हा नदीला दुथडी पाणी होते. या नदीच्या लगत अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. शनिवारी शेतीचे कामे आटोपून शेतकरी, मजूर घराकडे परत जात होते.

यादरम्यान त्यांना भीमणी नदीच्या पात्रात वाघ मृतावस्थेत आढळून आला. प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळ आले. मात्र, पाण्याच्या प्रवाहात वाघाचा मृतदेह समोर वाहून गेला. यासंदर्भात मध्य चांदा वन विभागाचे एसीएफ ए.शेंडगे यांना विचारणा केली असता वाघाचा मृतदेत मी प्रत्यक्ष बघितला नाही. मात्र, नदी पात्रातून वाघाचा मृतदेह वाहून गेला आहे.

वन विभागाने वाघाचा मृतदेह शोधण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे. नदीला पाणी असल्यामुळे मृतदेह दूरवर वाहून गेला असावा अशीही शक्यता शेंडगे यांनी लोकसत्ताशी बोलतांना व्यक्त केली. नदीचा प्रवाह जिथवर जातो तिथवर शोधण्याचे काम सुरू आहे. ज्या गावातून नदी जाते तिथेही ग्रामस्थांना वाघाचा मृतदेह दिसल्यास कळवावे असे कळविण्यात आलेले आहे. अद्याप तरी वाघाचा मृतदेह मिळाला नाही असेही त्यांनी सांगितले.