लोकसत्ता टीम

नागपूर : दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) धर्तीवर नागपूर एम्समध्येही तृतीयपंथीयांसाठी उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे या तृतीयपंथीयांना स्वतंत्र उपचार मिळणार असून हे मध्य भारतातील अशाप्रकारचे पहिलेच शासकीय केंद्र आहे.

तृतीयपंथीयांच्या समस्या आणि गरजा समजून नागपूर एम्समध्ये स्वतंत्र उपचार केंद्र सुरू झाले. या केंद्रात सर्व वयोगटातील रुग्णांना सर्व प्रकारच्या उपचाराची सुविधा मिळेल. केंद्रचा उद्देश या रुग्णांना गर्दीपासून दूर ठेवून कोणताही त्रास किंवा संकोच होऊ न देता उपचार देणे हा आहे. येथे लिंग बदलासारख्या सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

आणखी वाचा-नागपुरात काँग्रेसच्या वाढत्या मताधिक्याने भाजप चिंतेत! विधानसभेसाठी काय नियोजन…

या केंद्रात मानसोपचार, एंडोक्राइनोलॉजी, यूरोलॉजी, त्वचारोग, प्लास्टिक सर्जरी विभागाचे तज्ज्ञ एकत्र येऊन एकाच ठिकाणी सेवा देतील. लिंग शस्त्रक्रियेसह मानसोपचार, हार्मोनल उपचार आणि कॉस्मेटिक शस्त्रक्रियांसह (लहान आणि मोठ्या) सर्वच उपचार उपलब्ध असतील. या केंद्रासाठी मिशन विश्व ममत्व फाऊंडेशन या सामाजिक संघटनेने पाठपुरावा केला होता. सध्या शासकीय रुग्णालयात या समुदायावर सामान्यांसोबतच उपचार होत असल्याने ते उपचार टाळतात. कालांतराने त्यांची प्रकृती गंभीर होते. दिल्ली एम्सनंतर भोपाळ आणि रायपूर एम्सलाही नुकतेच असे केंद्र सुरू झाले आहे. सुरुवातीला आठवड्यात एक दिवस बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत हे केंद्र सुरू राहिल. कालांतराने रुग्णांच्या प्रतिसादानुसार त्यात वाढ होईल.

“तृतीयपंथीयांना गंभीर समस्या उद्भवल्यास दिल्ली एम्सला स्वतंत्र उपचाराची सोय असल्याने पूर्वी तेथेच जावे लागत होते. आता नागपूर एम्समध्ये उपचार मिळतील. ” -डॉ. प्रशांत जोशी, कार्यकारी संचालक, एम्स, नागपूर.

आणखी वाचा-‘नीट’ परीक्षेत मोठा गोंधळ, गुणांमध्ये प्रचंड वाढ! ‘चांगले गुण मिळवूनही दर्जेदार संस्थेत प्रवेश दुरापास्त

देशात एनएबीएच मानांकन प्राप्त करणारी पहिली संस्था

नागपूर एम्स हे ‘नॅशनल अँक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स’चे (एनएबीएच) मानाकंन प्राप्त करणारे देशातील पहिले एम्स रुग्णालय ठरले आहे. या कार्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेऊन ‘एम्स’ नागपूरच्या चमूचे अभिनंदन केले होते.

नागपूर एम्सचा प्रवास

नागपूर ‘एम्स’ला २०१८ पासून सुरुवात झाली. सप्टेंबर २०१९ पासून बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) तर फेब्रुवारी २०२० पासून आकस्मिक विभागासह वॉर्ड रुग्णसेवेत सुरू झाले. या पाच वर्षांमध्ये ‘एम्स’मध्ये ३८ हुन जास्त विभाग सुरू झाले. सध्या येथे १८ हुन अधिक वॉर्ड तर २३ हुन अधिक सुसज्ज अशी शस्त्रक्रिया गृह आहेत. रोजची ओपीडीची संख्या वाढून अडीच हजारांवर गेल अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसोबतच नुकतेच बोनमॅरो ट्रान्सप्लांट, किडनी प्रत्यारोपण सुरू झाल्याने मध्य भारतातील नागरिकांसाठी हे रुग्णालय आशेचे केंद्र ठरले आहे.