बुलढाणा : राज्यात आरक्षणावरून रान पेटले असून विविध समाजांतर्फे आरक्षणविषयक मागण्यांसाठी आंदोलने करण्यात येत आहे. राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आणि जागृत बुलढाणा जिल्ह्यातही हेच चित्र आहे. जिल्ह्याच्या तेराही तालुक्यांत आरक्षणाच्या मागण्यांवरून मोर्चे, धरणे, आदी आंदोलने सुरू आहे. मागील एक महिन्यापासून या आंदोलनाचा धडाका सुरूच आहे.

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात आज, सोमवारी, ६ ऑक्टोबरला सकल आदिवासी समाजातर्फे आदिवासी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर आज काढण्यात आलेला हा मोर्चा सर्वसामान्य स्थितीतील आदिवासी समाजाचे शक्तिप्रदर्शन ठरला. भगवान एकलव्य यांच्या प्रतिमा असलेले वेगवेगळ्या रंगाचे ध्वज, हाती तीरकमान घेऊन अस्सल आदिवासीची वेशभूषा साकारलेले युवक, हाती असलेले फलक, महिलांची लक्षणीय उपस्थिती, ढोल-ताशांच्या गजरावर थिरकणारे युवक, मोर्चाने फुलून गेलेले रस्ते, पोलिसांचा बंदोबस्त, असा या मोर्च्याचा थाट होता.

बंजारा आणि धनगर समाजाने केलेल्या अनुसूचित जमातीतील आरक्षण मागणीच्या विरोधात आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने बुलढाण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील जयस्तंभ चौकातील वीर एकलव्य पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो आदिवासी बांधवांसह धडकला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

आदिवासी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चाच्या नेत्या नंदिनी टारपे, एकलव्य संघटनेचे प्रदेश सचिव मधुकर पवार, आदिवासी पारधी संघटनेचे विदर्भ सचिव गजानन सोळंके, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मोरे यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो आदिवासी बांधवांची उपस्थिती होती. मोर्चादरम्यान आदिवासी बांधवांनी “एक तीर एक कमान, आदिवासी एक समान,” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

टांगलेले खेकडे, मांसे यासह विविध मागण्यांचे फलक व पारंपरिक पोषखात आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले. धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीत केलेल्या आरक्षणाची मागणीमुळे आदिवासी समाजावर अन्याय होण्याची भीती आहे. यामुळे अनुसूचित जमातीत या समाजांचा समावेश होवू नये, आदिवासी विकास निधी इतरत्र वळ्वू नये, यासह इतर मागण्यासंदर्भात हा मोर्चा काढण्यात आला.

शहरातील जयस्तंभ चौकातील वीर एकलव्य पुतळ्यापासून हा मोर्चा निघाला. बुलढाणा शहरातील मुख्य मार्गांवरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या माध्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. आदिवासी विकास परिषदेच्या नंदिनी टारपे, आदिवासी पारधी संघटनेचे विदर्भ सचिव गजानन सोळंके, एकलव्य संघटनेचे प्रदेश सचिव मधुकर पवार, एकलव्य भिल्ल समाजाचे जिल्हा अध्यक्ष विजय मोरे, आदींनी मोर्च्याचे नेतृत्व केले.