यवतमाळ : मनुष्य अनेक ग्रहांवर पोहोचले असताना माणसाच्या कुंडलीतील साडेसातीचे ग्रह मात्र कायम आहेत. भीती, अंधश्रद्धा यातून मनुष्य स्वतःच्या मनात नको ते ग्रह बाळगतो आणि अलगद भोंदूच्या तावडीत सापडतो. त्यामुळे, समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असताना अशा भोंदूंची चलती आहे. अशाच एका घटनेत यवतमाळ जिल्ह्यात दोन ठगबाजांनी चक्क साडेसातीची भीती दाखवून आर्थिक लूट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पारवा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शेलू गावातील एका कुटुंबाला साडेसातीची भीती दाखवून लुबाडणाऱ्या संजय देवराव वाळके (४०) व आकाश पिसाराम एकनाथ (२७) रा. शेलू, ता. कळमेश्वर, जि. नागपूर , ह.मु. मार्केट यार्ड पाठीमागील प्रांगणातील झोपड्या, ता. घाटंजी या ठगबाजांना पारवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फकिराच्या वेशभूषेत आरोपी भीक्षा मागण्यासाठी फिर्यादीच्या घरी पोहोचले होते. फिर्यादी कुटुंबाने भक्तिभावाने दोघांना गहू, पीठ, तेल अशी भीक्षा दिली. या दोन्ही भोंदुबाबांनी या कुटुंबाचा भोळेपणा हेरला. त्यातूनच तुमच्या मागे साडेसाती आहे. त्यामुळे, कुटुंबावर अनेक संकटे ओढवत असल्याची भीती दाखवली. ही साडेसाती दूर करायची असेल तर आम्ही तुमच्या घरी पूजा-अर्चा करू, ज्यामुळे तुमच्यावरील साडेसाती दूर होईल, अशी ग्वाही दिली. मात्र, त्यासाठी सहा हजार ५०० रुपयांचा खर्च येईल, असेही सांगितले.

हेही वाचा – बाप रे… ५२५ पक्ष्यांना मारले!

हेही वाचा – बुलढाणा : आत्मदहनाचा इशारा, पण पोलिसांचा तगडा बंदोबस्त; रविकांत तुपकर चक्रव्यूह भेदणार? वाचा…

दोन्ही भोंदू आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन फिर्यादीने रोख दोन हजार रुपये व फोन पे द्वारे चार हजार ५०० असे साडेसहा हजार रुपये आरोपींना दिले. मात्र, त्यानंतर ८ फेब्रुवारीला या दोन्ही भोंदूबाबांनी फिर्यादीला गाठले. तुमच्या मुलीचा शिवरात्री आधी जीव जाऊ शकतो, अशी भीती दाखविली. तिच्यावर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी मोठी पूजा आम्ही मांडू असे सांगितले. त्यासाठी १६ हजारांचा आणखी खर्च येईल, असेही दोघांनी सांगितले. या कुटुंबाचा विश्वास बसावा म्हणून दोघांनी काही वस्तूंची नावे देऊन ती घेण्याकरिता दुकानदाराला फोन पे क्रमांकावर पैसे पाठविण्याचे सांगितले. एकंदरित हे आरोपी वारंवार फोनवरून पैसे मागत असल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून पारवा पोलिसांनी इक्बाल शहा, रा. गिरड साखरबावरी याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्याला पकडायचे कसे, हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे हे प्रकरण यवतमाळच्या सायबर सेलकडेही पाठविण्यात आले. कॉल डिटेल्स तांत्रिक तपासाच्या मदतीने या प्रकरणातील आरोपी हे तोतयेगिरी करणारे असल्याचे स्पष्ट झाले. त्यातूनच इतर दोघांचेही बिंग फुटले. त्यांचे लोकेशन घाटंजी परिसरात निघाले. पारवा आणि घाटंजी पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two thugs looted money by showing fear in yavatmal district nrp 78 ssb