नागपूर : दहशतवादावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांच्या हस्ते व्हावे. जेणेकरुन पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळेल आणि लेखकाला प्रसिद्धीसुद्धा मिळेल. पण प्रकाशन होत नसल्यामुळे त्याची मानसिक स्थितीही ढासळली होती. लगेच प्रकाशझोतात यावे, यासाठी त्याने रेल्वे, विमान आणि मंदिरात बॉम्बस्फोट होणार असल्याचे भाकित असलेले ई-मेल पाठवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेतले असून जगदीशला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपी जगदीश उईके (रा. गोंदिया) याने २०१८ मध्ये ‘आतंकवादी एक तुफानी राक्षस’ नावाचे पुस्तक लिहिले. १२० पानांचे ते पुस्तक हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहे. जगदीशने कोठडीत असताना पोलिसांना सांगितले की, हैदराबादच्या प्रकाशक कंपनीकडून पुस्तक तयार केले आहे. त्यात अनेक वृत्तपत्रातील लेखांचा संदर्भ आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आटापीटा सुरु होता. या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या हस्ते झाल्यास पुस्तकाला भरभरुन प्रतिसाद मिळेल. पुस्तकाची विक्री वाढेल आणि त्यातून पुस्तकासाठी लागलेला पैसा मिळेल. तसेच लेखकालाही प्रसिद्धी मिळेल, एवढ्याचसाठी त्याने रेल्वे, विमानात बॉम्बस्फोट होणार असल्याचे ई-मेल पाठवून प्रशासनाला धारेवर धरले होते. जगदीशच्या या कृत्यामुळे विमान कंपन्यांना जवळपास एक हजार कोटींचा फटका बसला आहे. गुरुवारी जगदीशला सायबर पोलिसांनी अटक केली. त्याला रविवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी दिली.

हेही वाचा…नागपूर : मध्यरात्री अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या मिठीत; वडिलांनी…

मानसोपचार तज्ञांची मदत घेणार

जैश-ए-मोहम्मद आणि ‘एसजेएफ’ या दोन दहशतवादी संघटनांना ७५ हजार कोटींमध्ये सुपारी देऊन बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याची माहिती जगदीश उके देत आहे. तसेच काही ‘सिक्रेट कोड’ असल्याचेही पोलिसांना सांगत आहे. त्याच्या बोलण्यात काहीही तथ्थ नाही. त्यामुळे पोलिसांनी आता जगदीशला मानसोपचार तज्ञांची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जगदीशची मानसिक स्थिती योग्य नसल्याचा दावा पोलीस करीत आहेत.

हेही वाचा…मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत

जगदीशच्या घराची झडती

गोंदियात राहणारा जगदीश हा नागपुरात राहणाऱ्या मावशीकडे राहत होता. जगदीशचे दहशतवाद्यांशी तार जुळले आहेत का? असा संशय असल्यामुळे सायबर पोलिसांनी रविवारी जगदीश राहत असलेल्या घरावर छापा घातला. या छाप्यात जगदीशने दहशतवादावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रती आढळून आल्या. त्याशिवाय कोणतेही आक्षेपार्ह वस्तू किंवा साहित्य घरात आढळून आले नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uke send bomb threats email regarding jagdish uikes terrorism book publication adk 83 sud 02