लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : पुसद येथे महायुतीच्या सभेत भाषण देत असताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भोवळ येवून पडले. या घटनेने सभास्थळी एकच खळबळ उडाली. ही घटना आज बुधवारी दुपारी घडली. प्रचंड उन्हामुळे गडकरी यांना भोवळ आल्याचे सांगितले जात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ पुसद येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात दुपारी २ वाजता नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सर्वांची भाषणे झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी सुधाकरराव नाईक यांच्या आठवणी सांगत शेतकऱ्यांना शेती फायद्यात कशी आणायची याचे सल्ले दिले. जवळपास १५ मिनिटे ते बोलत होते. भाषणाच्या अखेरीस त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मंचावरील व्यक्तीस कुलर आपल्याकडे करण्यास सांगितले. त्यावेळी पुढे बोलताना त्यांचा स्वर कापरा झाला. तरीही त्यांनी राजश्री पाटील यांना निवडून द्या, असे आवाहन केले आणि हे आवाहन करत असतानाच त्यांचा तोल गेला. त्यांना पोडियमला धरून सावरण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षक व मंचावरील इतरांनी धावत जावून त्यांना उलचून खुर्चीत बसविले. त्यानंतर गडकरी यांना तातडीने ग्रीन रूममध्ये नेण्यात येवून डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आयोजकांनी सांगितले.

आणखी वाचा-भर उन्हात मुख्यमंत्र्याचे जय श्रीराम, जय हनुमान…

विदर्भात उन्हाचा प्रचंड तडाखा आहे. पुसदमध्ये तुलनेने अधिक ऊन आहे. गडकरी यांची सभा भर उन्हात ठेवण्यात आली होती. त्यातही सभा विलंबाने सुरू झाली. कापडी मंडप असल्याने उकाडा खूप होता. नितीन गडकरी यांचे भाषण रंगात आले असतानाच त्यांनी कुलर आपल्याकडे वळविण्याची सूचना केली तेव्हाच त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. तेथून दोन मिनिटांत ते बोलताना कोसळल्याने तारांबळ उडाली. या प्रकाराने सभास्थळी एकच खळबळ उडाली असून अनेकांनी गडकरींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सभास्थळी धाव घेतली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister nitin gadkari fainted and fall down while giving speech at yavatmal nrp 78 mrj
Show comments