नागपूर: महावितरणसह शासनाकडून स्मार्ट प्रीपेड मीटर चांगले असून वीज देयक अचूक येण्यास मदत होत असल्याचा दावा केला जातो. परंतु राज्यातील विविध ग्राहक संघटना, विद्युत क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनेसह विविध राजकीय पक्षाकडूनही या मीटरला कडाडून विरोध होत आहे. आता एक राजकीय पक्ष या मीटरविरोधात रस्त्यावर उतरला असून आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनासह स्मार्ट प्रीपेड मीटरची सध्याची स्थिती काय? याबाबत आपण जाणून घेऊ या.
शासनासह महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड मीटर योजना घोषीत झाल्यावर राज्यातील विविध भागात ग्राहक संघटनांसह इतर संघटनांनी एकत्र स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधी कृती समिती गठीत झाली होती. या समितीकडून सुरवातीला विविध भागात आंदोलनही झाले. यावेळी महावितरणसह शासनाला मीटरची योजना रद्द न केल्यास तिव्र आंदलनाचा इशारा दिला गेला. त्यानंतर विधान सभा निवडणूकीपूर्वी तत्कालीन उर्जामंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मीटर सामान्य ग्राहकांकडे लागणार नसल्याची घोषणा विधान सभेत केली होती. परंतु महायुतीची सरकार सत्तेवर आल्यावर उलट स्थिती दिसत असल्याचा आरोप वंचित बहुजन विकास आघाडीकडून केला गेला.
दरम्यान नागपुरातील बेसा परिसरात आंदोलन करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना हे मीटर न लावण्यासह वरिष्ठ पातळीवर येथील ग्राहकांना मीटर नको याबाबतचा अहवाल पाठवण्याची मागणी केली गेली. वंचितच्या कार्यकरनी सदस्य ॲड. सुजाता वालदेकर आणि नागपुर जिल्हा उपाध्यक्ष प्रिन्स शामकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. आंदोलनात जनतेवर अवावजी बोझा वाढवनाऱ्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली. वंचितच्या बॅनरखाली झालेल्या आंदोलनात सरकार व महावितरणविरोधी नारे लावत बेसा नगर पंचायतला निवेदन दिले गेले. यावेळी राजहंस तिरपुडे, व्ही. एस. तोडेकर, उमेश गुडधे, एम. एन. वानखेडे, अनिता वानखेडे, वंदना सोनटक्के, लिना गायकवाड, शारदा रामटेके, कविता गाडगे, बागडे मामा, भुमेश टेभेंकर, आनंद ठाकुर, विशाल कसबे, प्रमोद गहलोत, प्रकाश सोनटक्के, गजानन ठाकरे, मंगला काळे, आरुणा कोल्हे, माया लोहकरे, वर्षा कांबले, रवीराज कुंभारे व नागरिक उपस्थित होते.
नगर पालिकेला दिलेल्या निवेदनात काय ?
वंचितने नगर पालिकेला दिलेल्या निवेदनात सांगितले की, स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात अहवाल बनवुन महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावा. स्मार्ट प्रीपेड मिटर ला जनतेचा विरोध आहे. हे मीटर लागल्यास नगर पंचायत परिसरात तिव्र आंदोलन केले जाईल. जनतेची स्मार्ट प्रीपेड मीटरच्या माध्यमातून होणारी लूट चालू दिली जाणार नाही.