चंद्रपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवारांच्या विरोधात २८ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र देवून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना विरोधी पक्षनेते करावे यासाठी सर्व प्रयत्न सुरू असताना दिल्लीच्या नेत्यांना गोळी देवून वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेते पद खेचून आणले. २०२४ मध्ये वडेट्टीवाराना मुख्यमंत्री करू असे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हणताच वडेट्टीवार यांनी मला मुख्यमंत्री करायला निघाल्या की फटाके, बॉम्ब, एटमबॉम्ब लावत आहेत. कांग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी नाव चालले की कसे फटाके लागतात हेच सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने शनिवारी स्थानिक गांधी चौकात विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली मृत्यूनंतर वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर प्रथमच काँग्रेस पक्षाच्या मंचावर एकत्र आले होते. वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात मागील अनेक दिवसांपासून राजकीय वाद सुरू आहे. एकमेकांची नावे निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यापासून तर एकमेकांवर टीका करण्यापर्यंत हे भांडण सुरू आहे. मात्र शनिवारी सत्कार कार्यक्रमात एका मंचावर येताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसच्या २८ आमदारांनी वडेट्टीवारांच्या नावाला कसा विरोध केला, आमदार संग्राम थोपटे यांना समर्थन करीत वडेट्टीवार यांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली, दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांना २८ आमदारांच्या स्वाक्षरीने पत्र दिले हा संपूर्ण किस्साच सांगितला. वडेट्टीवार यांना राज्यातून २८ आमदारांचा विरोध असताना त्यांनी दिल्लीच्या नेत्यांना कोणती गोळी देवून विरोधी पक्षनेते पद खेचून आणले हे त्यांचे त्यांनाच माहिती. वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले यासाठी त्यांचे अभिनंदन. भविष्यात त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, मी त्यासाठी त्यांचासोबत राहील असेही श्रीमती धानोरकर म्हणाल्या.

हेही वाचा – वर्धा जिल्ह्यात संततधार; धरणातून विसर्ग सुरू, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

हेही वाचा – वर्धा : गाव गहिवरले! जिल्हा परिषदेच्या शाळेतील संस्कार; सैन्यदलात भरारी

सत्कार सोहळ्यात उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, तुम्ही मला मुख्यमंत्री करायला निघाल्या की फटाके, बॉम्ब लावायला निघाल्या. काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी नाव समोर केले तर कसे फटाके लागतात हेदेखील वडेट्टीवार यांनी सांगितले. दरम्यान माझ्या विरोधात तुम्ही पक्षाच्या २८ आमदारांच्या स्वाक्षरी घेतल्या हे खरे असले तरी तुम्हाला न कळत त्याच २८ पैकी १५ आमदारांनी मला विरोधी पक्षनेता करा म्हणून मीदेखील सह्या घेतल्या होत्या. याचे साक्षीदार स्वतः जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा रजुराचे आमदार सुभाष धोटे आहेत, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी वडेट्टीवार व धानोरकर यांनी आपल्या भाषणात एकमेकांना चांगल्याच कोपरखळ्या घेतल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar comments on pratibha dhanorkar over the post of congress leader of opposition in chandrapur rsj 74 ssb