लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : महायुती सरकार मधील लाडके भाऊ राज्यातील लाडक्या बहिणींची फसवणूक करीत आहेत अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना पत्र लिहून केली आहे. या पत्रात वडेट्टीवार यांनी म्हटले आहे,

आदरणीय ताईस,
सप्रेम नमस्कार

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!

ताई तुझा सन्मान म्हणून सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली. आम्हाला ही आमच्या बहिणीचा मान ठेवायचा होता, या योजनेचे आम्ही देखील स्वागत केले! आपण सर्व लाडक्या बहिणींनी या सन्मान पोटी महायुतीच्या झोळीत भरभरून मत टाकली. आणि तुमच्या आशीर्वादाने सरकार सत्तेत आले.

ताई, सत्ता आली पण एखादा भाऊ इतका बेईमान असू शकतो का? सध्याचे जे चित्र आहे त्यामुळे हा प्रश्न पडत आहे. निवडणुकीत मत हवी म्हणून कोणत्याही अटी शर्ती न घालत बेगडी प्रेम दाखवले. तुमच्या खात्यात आधीच ओवाळणी दिली.

निवडणुकीत भावांचे अधिक प्रेम आहे दाखवण्यासाठी महायुती सरकार आल्यास २१०० रुपये देण्याचे अभिवचन दिले होते. पण आता मात्र विविध निकष लावून तुझे नाव वगळण्याची बेइमानी सुरु केली हे अन्यायकारक आहे. मनाला खंत वाटते तुझे मत घेताना इतकी बनवाबनवी केली नव्हती, मग हेतू साध्य झाल्यावर मात्र अटी शर्ती का लावण्यात आल्या?

कोणताही भाऊ एका बहिणीशी अस वागू शकतो का हा प्रश्न नक्कीच तुला पडला असेल. मतांच्या लाचारी साठी बहिणीवर उसने प्रेम दाखवणाऱ्या या बेईमान भावांना तू माफ करशील का? एकीकडे महिलादिन, महिलांच्या कर्तृत्वाचा अभिमान, आदर आणि दुसरीकडे हेच लाडके भाऊच तुमची फसवणूक करत आहेत !

ताई, या राज्यात तुला सुरक्षित वाटते का? दररोज महिला अत्याचाराच्या घटना ऐकून आम्हाला वेदना होतात.

तू आई आहेस, तू बहिण आहे. ताई, तू एक मुलगी देखील आहेस. अनेक नात्यात गुंतलेली तू माऊली आहेस. कोणत्याही क्षेत्रात भरारी घेऊन पुरुषांच्या पुढे जाण्याची शक्ती तुझ्यात आहे. पण जर तुलाच सुरक्षित वाटत नसेल तर आम्ही नालायक भाऊ ठरतो! तुझ्या वेदना आमच्याही आहेत, रोज घडणारे अत्याचार बघून लाज आम्हाला ही वाटते.

तू दुर्गा
तू जिजाऊ
तू सावित्री
तू रमाई आहेस
अन्याया विरोधात लढण्याची शक्ती तुझ्यात आहे.

ताई आज तरी तू शांत आहेस , तुझ्यात दुःख पचविण्याची खूप क्षमता असली तरी आता मात्र तुझे रौद्र रूप या लाडक्या भावांना दाखवण्याची वेळ आली आहे.

तुझ्याकडून या भावाच्या इतक्याच अपेक्षा!
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा.

तुमचा भाऊ
विजय वडेट्टीवार

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwars emotional letter to womens in the state rsj 74 mrj