नागपूर : राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतील ‘सेक्युलर’ शब्दांचा अर्थ धर्मनिरपेक्ष नव्हेतर सर्वधर्मसमभाव असायला हवा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.आर.एस. रुईकर इन्स्टिट्यूट ऑफ लेबर अँड सोशियो-कल्चरल स्टडिज, नागपूर यांच्यातर्फे कामगार केसरी रुईकर स्मृती विशेष चर्चासत्राच्या मालिकेत “समाजवाद व धर्मनिरपेक्षता : भारतीय जनतेच्या आकांक्षापूर्तीचे सूत्र” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम हिंदी मोर भवन, झांसी राणी चौकातील मधुरम सभागृहात सोमवारी आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी वक्ते म्हणून विचारवंत व सामाजिक कार्यकर्ता डॉ. तेजिंदरसिंग रावल, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विद्या चौरपगार, अध्यक्षस्थानी रुईकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते.सिरपूरकर म्हणाले, न्यायमूर्ती शब्दांच्या बाबत काटेकोर असतात. राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष नव्हेतर सर्वधर्मसमभाव असायला हवे. प्रत्येकाने सर्व धर्माचा सन्मान केला पाहिजे. मात्र, राजधर्माचा अर्थ वेगळा आहे. ‘राज्या’चा (सरकार) धर्म नसतो तर त्याने सगळ्यांना एकाच दृष्टीने पाहणे हाच राजधर्म आहे. समाजवाद आणि सर्वधर्मसमभाव एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
भारतीय राज्यघटनेची मूळ चौकट कोणालाही बदलण्याचा अधिकार नाही. एखाद्या राजकीय पक्षाचे ४०० खासदार निवडून आले तरी राज्यघटनेच्या चौकटीला छेद दिला जाऊ शकत नाही. संसदेला केवळ कायदे बनवण्याचे अधिकार आहे. त्या कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार न्यायपालिकेला आहे आणि त्याच्या कायद्याची अंमलबजावणी कार्यपालिकेने करायचे आहे. आपल्या राज्यघटनेत अतिशय उत्तम समतोल साधण्यात आला आहे. त्यामुळे ती सर्वश्रेष्ठ राज्यघटना ठरली आहे, असेही ते म्हणाले.
देशात आणीबाणी लागू असताना राज्यघटनेत दुरुस्ती करून प्रास्ताविकेत समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता असे तीन शब्द जोडण्यात आले. समाजवाद, धर्मनिरपेक्षता मूळ राज्यघटनेत नसली तरी त्यातील राज्यघटनेचा तोच गाभा आहे. ते अनेक कलमातून प्रतिबिंबित होते, असे डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विद्या चौरपगार म्हणाल्या.
भारत हे धार्मिक राष्ट्र नाहीत तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. सरकारने धर्मापासून अंतर राखण्यासोबत सर्व धर्मांचा सन्मान करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास राज्यघटनेचा अपमान ठरेल. समाजवादाची संकल्पना रूजवण्यासाठी आणि देशाच्या उत्थानासाठी सर्वांना शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे गरजेचे, असे विचार सामाजिक कार्यकर्ता डॉ. तेजिंदरसिंग रावल यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. खांदेवाले यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रास्ताविक रमेश पाटणे यांनी केले. संस्थेचा परिचय डॉ. गौतम कांबळे यांनी केला.