नागपूर : विदर्भातील बुलढाणा जिल्यातील साध्या ग्रामीण कुटुंबातून पुढे आलेले विशाल नरवाडे आज प्रशासनातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरले आहेत. ज्याच्या घरी साधा नळदेखील नव्हता, तोच मुलगा आज सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतो, ही गोष्टच स्वतःत एक प्रेरणाकथा आहे. या समाजाला प्रेरणा देणाऱ्या कथेबाबत आपण जाणून घेऊ या.

मिशन आयएएस, अमरावती कॅम्पचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी विशाल नरवाडे यांच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला आहे. प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे म्हणाले, जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रथम विशाल नरवाडे यांनी आयपीएस म्हणून यश मिळवले. मात्र त्यावर समाधानी न राहता त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले. विशाल नरवाडे नेहमी म्हणतात, “माझ्या हातात फक्त एक हजार रुपयांचा साधा मोबाईल होता. त्यात जास्त फिचर्स नव्हते. त्यामुळे वेळ वाया न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करता आले. त्यांच्या वडिलांनी दिलेले ‘मी आयएएस अधिकारी होणारच’ हे पुस्तक त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरले. वडिलांचे मार्गदर्शन आणि आईचे साथसोबत अभ्यास करताना मिळालेले पाठबळ यामुळेच ते दिल्लीसारख्या वातावरणात टिकून राहू शकले, असेही प्रा. काठोळे यांनी सांगितले.

विशाल नरवाडे प्रथम आयपीएस झाले आणि पश्चिम बंगालमध्ये पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले. परंतु ध्येय होते आयएएस. कठोर परिश्रम, निवडणुकीच्या धकाधकीतही सुरू ठेवलेला अभ्यास आणि चिकाटी यामुळे अखेर राष्ट्रीय स्तरावर ८१ वा क्रमांक पटकावत ते आयएएस झाले. आज ते जिथे जातात तिथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रोत्साहित करणे हे काम हिरीरीने करतात. अगदी चारचाकी ट्रॅफिकमध्ये अडकली तरी मोटरसायकलवर बसून महाविद्यालयात व्याख्यानासाठी पोहोचणे – ही त्यांची तळमळ खऱ्या अर्थाने वेगळी ठरते.

महाराष्ट्रातील सांगली, बुलढाणा, धुळे अशा जिल्ह्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी केलेले काम आणि समाजाशी नाते टिकवून ठेवण्याची त्यांची शैली त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. विशाल नरवाडे यांचा प्रवास हा दाखवतो की साधेपणातही मोठेपणा साधता येतो. संघर्ष, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर कोणताही ग्रामीण तरुण प्रशासनातील नवा दीपस्तंभ होऊ शकतो, असेही प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी सांगितले. या संघर्षाची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेण्याची गरज असल्याचेही प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी सांगितले.