चंद्रपूर : विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदार संघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजप व केंद्रीय निवडणूक आयोगाची भ्रष्ट युती समोर आणली आहे.

महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघातही झाला आहे. येथे ६ हजार ८५३ मते सुरुवातीला मतदार यादीत समाविष्ट केली. काँग्रेस नेत्यांना हा घोळ लक्षात आल्यानंतर ही सर्व मते त्यानंतर डिलिट करण्यात आली. ॲड ॲन्ड डिलिटचा हा खेळ राजुरा मतदार संघात झाला अशी माहिती काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या आरोपामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजुरा विधानसभा मतदार संघातील ६ हजार ८५३ मतदार यादीतून वगळण्याचे प्रकरण चर्चेत आले आहे.

खासदार राहुल गांधी यांनी पत्रपरिषदेत कर्नाटक राज्यातील आनंद या मतदार संघात कशा पद्धतीने मतचोरी झाली हे तेथील काही मतदाराना प्रत्यक्ष पत्रकारांसमोर साक्षात उभे करून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे सांगितले. केवळ आनंद या एकाच मतदार संघात हा प्रकार झाला नाही तर महाराष्ट्रातील राजुरा या आजवर कांग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या विधानसभा मतदार संघात देखील ६ हजार ८५३ जणांची नावे कशा पद्धतीने पाहिले मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आणि हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ही सर्व नावे मतदार यादीतून कशा पद्धतीने वगळण्यात आली याची सविस्तर माहिती खासदार गांधी यांनी दिली.

विशेष म्हणजे, या प्रकरणी राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजूनही पोलिस आरोपी पर्यंत पोहचू शकली नाही. दरम्यान २०२४ च्या विधानसभा निवडणूक पासून हे गंभीर प्रकरण चर्चे आहे. त्यावर कारवाई शून्य आहे. विशेष म्हणजे राजुराचे माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे. मात्र जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून त्यांना ठोस उत्तर दिले जात नाही असाही आरोप धोटे यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. तर याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

पण ११ महिने झाले तरी अद्याप यावर कोणतीच कारवाई होत नाही. या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा ही इशारा प्रदेश काँग्रेस समितीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी पत्र परिषद घेऊन दिला आहे. विशेष म्हणजे लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या ५ महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदार संघात ५५ हजार मतदारांची वाढ करण्यात आली. राजुरा मतदारसंघात १ ऑक्टोबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ११ हजार ६६७ ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर ६ हजर ८५३ मते डिलिट करण्यात आली.

याप्रकरणी एफआयआर ही दाखल करण्यात आला आहे. पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही. ही ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे IP address, email id आणि मोबाईल नंबर ची माहिती द्यावी अशी मागणी धोटे यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे. पण आजपर्यंत ती देण्यात आलेली नाही. ही माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देत नाही असाही आरोप धोटे यांचा आहे. राजुरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराकडे ६१ लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले. निवडणूक आयोगाच्या FST पथकाने ही कारवाई केली आहे, गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पण आजपर्यंत यावरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

मतचोरी प्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई संदर्भात काहीच हालचाल केली जात नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेच पण न्यायालयातही लढा देऊ, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.