वर्धा : अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाल्याचे चित्र आहे. वर्धा जिल्ह्यात पिक पेरणीच्या दिवसांपासून सतत व मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर, यांसारखी महत्त्वाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांची लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून उभी पिके आडवी झाली आहेत. सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने सूरू झाली आहे. झाडून सर्व शेतकरी नेते आंदोलनाचा ईशारा देत शासनाकडे मागणीपत्र देते झाले आहे. मात्र एक आंदोलन अभिनव व पहिलेच असे ठरले आहे. नवरात्र सूरू आहे. ठिकठिकाणी ज्योत पेटवून आराधना सूरू आहे. मात्र आराधना नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असंख्य ज्योती रात्री पेटविण्यात आल्यात. क्रांतिकारी शेतकरी संघटना व युवा संघर्ष मोर्चातर्फे किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली.

हे आंदोलन न्याय मिळेपर्यंत सूरू राहणार असल्याचा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला. पिकांच्या उत्पन्नात देखील मोठी घट होणार आहे.भारतीय हवामान विभागच्या अहवालानुसार, वर्धा जिल्ह्यात १ जून २०२५ ते २३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत एकूण ९८८.७ मिमी पाऊस झाला आहे, जो सामान्य (८१९.२ मिमी) पेक्षा २१% जास्त आहे. व एकट्या सप्टेंबर महिण्यात सरासरीपेक्षा १३७ टक्के पाऊस जास्त झाला आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्हाभरात प्रचंड नुकसान झाले आहे.

वर्धा जिल्ह्यातील एकूण ५४ मंडळापैकी फक्त ३५ मंडळात अतिवृष्टी झाल्याचे प्रशासनाचे वतीने सांगण्यात येत आहे, मात्र उर्वरित १९ मंडळात देखील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी. त्याचप्रमाणे शासनाने मदतीचे निकष बदलवून दोन हेक्टर ची मर्यादा ठेवू नये. घरखर्च, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, पिकांचे कर्ज या सर्वावर गदा आली आहे. आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून शेतकरी उपासमारीच्या काठावर उभा आहे.

काही प्रमुख मागण्या झाल्या आहेत.वर्धा जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ घोषित करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान ५०,०००/- रुपये सरसकट नुकसानभरपाई, पंचनामे करून केवळ काही मोजक्या शेतकऱ्यांना निवडक लाभ न देता, सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, संपूर्ण कर्जमाफी तातडीने जाहीर करावी.शेतकऱ्यांना तक्रारीची मुभा नसल्याने नविन पिकविमा पद्धत ही शेतकऱ्यांच्या फायद्याची नसून कंपनीच्या फायद्याची आहे. त्यामुळे जुनीच पिकविमा पद्धत ठेवून त्याचे निकष सुद्धा बदलवू नये, जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी मजबूत तार कुंपणाची योजना शेतकऱ्यांना मोफत द्यावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी विशेष पॅकेज व कायमस्वरूपी उपाययोजना अमलात आणाव्या, अश्या व अन्य मागण्या आहेत.

शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे अथवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात त्वरित ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अन्यथा शेतकरी बांधवांच्या जनआक्रोशाला शासन जबाबदार राहील.
शेतकरी बांधव न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मोठा संघर्ष उभारला जाईल याची शासनाने नोंद घ्यावी, असा ईशाराही देण्यात आला आहे.