नागपूर : राज्य सरकार ५४ लाख नोंदी सापडल्याचे सांगत आहे. परंतु त्यापैकी किती लोकांकडे आधीपासून कुणबी प्रमाणपत्र आहे आणि नवीन किती लोकांना असे प्रमाणपत्र दिले जाणार आहे, हे लपवून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर आणि मुंबईत धडकेल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सरकारला ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्या १९६७ च्या पूर्वीच्या आहेत. आजच्या तारखेची एकही नोंद नाही. १९६७ च्या पूर्वीच्या ज्यांच्याकडे नोंदी आहेत. त्यांच्याकडे आधीपासूनच कुणबी प्रमाणपत्र आहे. नागपूर जिल्ह्यात २ लाख ३५ हजार नोंदी सापडल्या आहेत. यामध्ये एकही नवीन नोंद नाही. मराठवाड्यात केवळ २८ हजार नोंदी सापडल्या आहे. तेथे देखील बहुतांश लोकांकडे आधीपासून कुणबी जातीचे प्रमाणपत्र आहे. जर का नवीन नोंदी १-२ टक्के असतील तर नवीन नोंदी कोणत्या आहेत त्याचा आकडा सरकारने जाहीर करायला हवा. सरकार ५४ लाख नवीन नोंदी असल्याचे सांगून ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहे. सरकारने ५४ लाख नोंदीचे सर्वेक्षण करून कोणाकडे आधीपासून प्रमाणपत्र आहे आणि नवीन नोंदी किती याची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली.

हेही वाचा – सुनेला वाचविण्यासाठी सासूने हात दिला अन् दोघीही बुडाल्या; गणपूर नाव दुर्घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात हळहळ

हेही वाचा – वर्धा : मराठा सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार; म्हणतात, “आमचे काम नव्हे,” प्रशासन पेचात…

सर्वोच्च न्यायालयाच्या ५ मे, २०२१ च्या निकालातून मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही मनोज जरांगे ५४ लाख कुणबी नोंदी भेटल्या असे म्हणत आहेत. सरकारने संपूर्ण ५४ लाख नोंदी कुणाच्या आहेत ते आधी जाहीर करावे व नोंदीचे वर्गीकरण करण्यात यावे. तसेच दिनांक २७ डिसेंबर २०२३ ला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) २००० अधिनियम सुधारणेचे महाराष्ट्र सरकारने काढलेले राजपत्र रद्द करावे. यासाठी ७ फेब्रुवारी २०२४ ला गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरपर्यंत मोर्चाचे आयोजन केले आहे, असेही तायवाडे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warning of national obc federation regarding kunbi certificate will there be a protest in mumbai rbt 74 ssb