अमरावती : मी भाजपमध्‍ये कधीही येणार नाही, असे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍यासमोर ठणकावून सांगणारे आमदार रवी राणा हे आता मात्र मी भाजप समर्थित उमेदवार असल्‍याचा अपप्रचार करीत आहेत. त्‍यामुळे आम्‍ही सर्व मिळून रवी राणा यांना बडनेरा मतदारसंघात धडा शिकवणार आहोत. नवनीत राणा या घरी बसल्‍या, तसेच रवी राणांना घरचा रस्‍ता दाखवून पती-पत्‍नी एकत्रिकरण योजना राबवू आणि त्‍यांना नांदा सौख्‍यभरे अशा शुभेच्‍छा देऊ, अशा शब्‍दात भाजपचे नेते आणि बडनेरातील इच्‍छूक उमेदवार तुषार भारतीय यांनी राणा दाम्‍पत्‍यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बडनेरा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांच्‍या संवाद बैठकीत बोलताना तुषार भारतीय यांनी रवी राणांवर थेट हल्‍ला चढवला. प्रा. रवींद्र खांडेकर यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. माजी जिल्हाध्‍यक्ष निवेदिता चौधरी, संजय नरवणे, चेतन गावंडे, किरण महल्ले या तीन माजी महापौरांसह बडनेरा मतदार संघातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा…गोंधळ घालून भाजयुमोने संविधान धोक्यात असल्याचे सिद्ध केले काय?

तुषार भारतीय म्‍हणाले, पाऊस असो, थंडी असो शेतकरी शेतात राबराब राबतो. मोठ्या मेहनतीने शेतकरी आपल्या शेतात पीक घेतो, हे पीक जेव्हा कापायची वेळ येते तेव्हा आपल्या शेतातील पीक दुसऱ्याने कापून नेलेले त्याला दिसल्यावर प्रचंड दुःख होते. अगदी अशीच परिस्थिती आज भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची झाली आहे. बडनेरा आणि अमरावती मतदारसंघात गेली चार वर्ष ११ महिने बूथ प्रमुख, पेज प्रमुख म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी कामे केली. मन की बात ऐकली. सामूहिक मन की बात ऐकायला देखील आम्ही एकत्र आलोत. आज मात्र बडनेरा आणि अमरावती दोन्ही ठिकाणी भलतीच व्यक्ती येऊन आमच्या भरवशावर निवडणूक लढण्यास तयारीला लागली. हा संपूर्ण प्रकार म्हणजे आपण आपल्या डोक्यावर हात मारून घ्यावा असाच आहे. भाजपाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र राहिले तर अशा मंडळींना संधी मिळणार नाही. यामुळे आपण एकत्र यायला हवे, असे तुषार भारतीय म्हणाले.

हे ही वाचा…“वर्ध्यातील चारही जागा भाजपच लढणार,’’ नितीन गडकरी यांच्या विश्वासू नेत्याचा दावा

बडनेरा मतदारसंघातील अनेक गावांत पक्के रस्ते नाहीत. राजुरा, चिरोडी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील राणा सोडवू शकले नाहीत. अनेक गावांची अवस्था अतिशय खराब आहे. मतदारसंघातील शासकीय जमिनी राणांनी हडपल्या. राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत, अशी टीका देखील तुषार भारतीय यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will all teach ravi rana lesson in badnera constituency said bjp leader tushar bharatiya mma 73 sud 02