नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल कॅमेऱ्याचा अविष्कार होण्यापूर्वीच त्या कॅमेऱ्याने छायाचित्र काढत होते, रेल्वे स्थानक सुरू होण्याच्या आधी ते तेथे चहा विकत होते, असे एक ना अनेक चमत्कार मोदी यांच्या नावावर आहेत, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. त्यांच्या अनेक प्रकारांची आठवण त्यांना शुभेच्छा देताना करून द्यावी वाटते, असे सपकाळ म्हणाले.

अमरावती येथे ते पत्रकारांशी बोलत होते. सपकाळ म्हणाले, मोदी यांच्या शुभेच्छा जाहिराती ‘बोले तैसा चाले’ अशा आहेत. पण ते अगदी त्याच्या उलट वागत आहेत. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ, दरवर्षी दोन कोटी नौकऱ्या देऊ, बेरोजगारी संपवून टाकू, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, अशी अनेक आश्वासने त्यांनी दिली होती. पण त्यातील एकही त्यांनी पूर्ण केलेली नाही. त्यांनी दिलेल्या वचनांचे पालन करावे, अशी अपेक्षा आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करूया.

केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. तेव्हापासून सत्तेचे केंद्रीकरण सुरू आहे. फडणवीस यांना त्यांच्या खिशात सत्ता हवी आहे. २०२२ पासून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या नाही. याला त्यांचे केद्रीयकृत राजकारणच जबाबदार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ न देण्याचा घाट फडणवीस यांनीच घातला होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जो निर्णय दिला तो फडणवीस यांना चपराक आहे. असे हर्षवर्ध सपकाळ म्हणाले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. विविध वर्तमानपत्रात विविध योजनांच्या जाहिराती भारतीय जनता पक्ष व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आाहेत. त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांवर सपकाळ यांनी भाष्य केले.