अमरावती : शहरात सार्वजनिक ठिकाणी ‘आय लव्ह मोहम्मद’चे बॅनर्स लावून दंगल घडवून आणण्याचे कटकारस्थान शिजत आहे. पोलिसांनी यासंदर्भात तातडीने दखल घेऊन संबंधितांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
डॉ. अनिल बोंडे म्हणाले, ‘आय लव्ह मोहम्मद’ असे वाक्य लिहिलेले बॅनर्स सार्वजनिक ठिकाणी लावणे योग्य नाही. त्यांना जर पोस्टर्स लावायचेच असेल, तर ते त्यांनी त्यांच्या दुकानांवर लावावे, त्यांच्या टॅक्सीवर किंवा ऑटोरिक्षांवर लावावे, म्हणजे त्‍यांच्या दुकानांमध्ये जायचे की नाही, हे हिंदूही ठरवू शकतील. पोस्ट लावल्यानंतर यांच्या ऑटोरिक्षांमध्ये बसायचे की नाही, हे आम्हाला ठरवता येईल.

डॉ. अनिल बोंडे म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर्स जर लावले जात असतील, तर पोलीस प्रशासन, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ त्याची दखल घेतली पाहिजे. त्यावर कारवाई करून हे बॅनर्स काढूनही टाकले जातील. महाराष्ट्रातील गृह विभाग आणि पोलीस प्रशासन अत्यंत जागरूक आहे. अहिल्यानगर मध्ये काही लोकांनी दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांचा प्रसाद कसा मिळाला, हे सर्व लोकांनी पाहिले आहे. कुणी जर मस्ती दाखवत असेल, तर त्याची मस्ती उतरविण्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस प्रशासन निश्चितपणे सक्षम आहे.

डॉ. अनिल बोंडे म्हणाले, माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की, सार्वजनिक ठिकाणी ‘आय लव्ह मोहम्मद’ अशा प्रकारचे बॅनर्स लावून समाजामध्ये असंतोष पसरविण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल, तर ताबडतोब त्या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे.

‘आय लव्ह मोहम्मद’ हे एक बॅनर लावले गेले होते. या वादाची सुरूवात उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाली. मात्र आता त्याचे पडसाद केवळ उत्तर प्रदेशापुरते मर्यादित न राहता, उत्तराखंड, तेलंगणा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उमटत आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्षही पाहायला मिळाला आहे.

काय आहे ‘आय लव्ह मोहम्मद’ वाद

गेल्या ४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान हा वाद सुरू झाला. मिरवणुकीच्या मार्गावर काही लोकांनी ‘आय लव्ह मोहम्मद’ असे बॅनर लावल्याचे सांगितले जाते. या कृतीला हिंदू संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला. यामागे जाणूनबुजून भावना भडकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला.