नागपूर : विदर्भ पुत्र व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून दिल्लीत झालेल्या बैठकीत विदर्भ आणि मराठवाडा विभागातील दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांच्या अंमलबजावणी संदर्भात, तसेच पशुसंवर्धन विषयाशी निगडीत महत्त्वाची बैठक बुधवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थित त्यांच्या शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीस केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह केंद्र सरकारचे आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – नागपूर : प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून

दुग्धविकास आणि पशू संवर्धन संदर्भात पहिला टप्पा पूर्ण झालेला असून, दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत  प्रकल्प राबविण्यात येणाऱ्या अडचणी केंद्र सरकारसमोर मांडण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने सर्वतोपरी मदत करू, असे सकारात्मक आश्वासन दिले असून दुसऱ्या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात येईल, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.

विदर्भ आणि मराठवाडा विभागात दुग्धविकास प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश होता, आता यामध्ये गडचिरोली या जिल्ह्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रथम टप्प्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांकडून प्रतिदिन १७० लीटर दूध मदर डेयरी घेत असे, आता प्रतिदिन ३ लाख लीटरपर्यंत क्षमतेत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – अमरावतीत ‘ब्रॅण्डेड’च्या नावावर बनावट घड्याळींची विक्री

दुसऱ्या टप्प्यात ११ हजार जनावरांचे वाटप करण्यात येणार असून  २० हजार मेट्रीक टन प्रजननक्षम पशुखाद्य देण्यात येणार असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.  यासह १२ हजार एकर क्षेत्रात पशू खाद्याची लागवड करण्यात येणार आहे. सोबतच १० हजार कडबा कुट्टी यंत्र लावण्यात येतील. १ लाख ६२ हजार वांझ जनावरांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तर, १० लाख कृत्रिम रेतन करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाकडून ११ हजार बायोगॅसचे युनिट वाटप केले जाईल. प्रत्येका जिल्ह्यात मोबाईल वेटरनरी युनिट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विखे यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What was decided in the meeting held at nitin gadkari residence regarding the dairy project in vidarbha and marathwada cwb 76 ssb