नागपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र होय. या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. ते बौद्धांच्याच ताब्यात असावे, यासाठी विविध बौद्ध संघटनांकडून आंदोलन केले जात आहे. अनेक बौद्ध विहारांमध्येही आंदोलन करून केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले आहे. सोमवारी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बुद्धगया महाबोधी महाविहार हिंदू पंडितांच्या तावडीतून मुक्त करून बौद्धांच्या हातात द्या, अशी मागणी करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. बौद्ध अनुयायी भिक्खू आणि जगभरातील पर्यटक तसेच शांतीचा मंत्र जपणारे बांधव येथे येतात. मात्र, या महाविहाराचे नियंत्रण व व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई १९९२ पासून आंदोलन करीत आहे. सध्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहे. सोमवारी डॉ. भूषण भस्मे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

१९४९ चा कायदा रद्द करून विहाराचे व्यवस्थापन व नियंत्रण बौद्धांना सोपवण्यात यावे, याकरिता १९९३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, केंद सरकारतर्फे वाटाघाटी सुरू होत्या. सरकारच्या विनंतीवरून ही याचिका मागे घेतली. दरम्यान केंद्र सरकार आणि बिहार राज्य सरकारने कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून पुन्हा याचिका दाखल केली. १९९२ पासून आतापर्यंत आंदोलन सुरू असून सध्या विविध सामाजिक संघटना यासाठी आक्रमक झाल्या आहेत.

आंदोलनाची कारणे

बोधगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा.

बोधगया मंदिर व्यवस्थापन कायद्यात सुधारणा करावी.

महाबोधि विहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदूं ऐवजी बौद्ध समाजाच्या हाती सोपवावे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why buddhists agitation all over india mahabodhi mahavihara bodhgaya dag 87 css