नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची एक विशिष्ट पद्धत आहे. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे अनेक चाहतेही आहेत. त्यांच्या जनसंपर्क कार्याक्रमातून अनेकदा याची प्रचिती येत आहे.
अनेक सामाजिक उपक्रमांमध्येही गडकरी अग्रेसर असतात. रविवारी त्यांचा जनसंपर्क अभियान होता. यादरम्यान एक अनोखा प्रकार घडला. यावेळी गडकरींना एक महिलेचे पत्र आले. या पत्रामध्ये त्या महिलेने लिहलेला मजकूर वाचून गडकरींविषयी असलेल्या सामाजिक कार्याची महती कळून येते. काय आहे हा संपूर्ण प्रकार बघुया…
गडकरींच्या जनसंपर्क कार्यक्रमात रविवारी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. गडकरी यांनी आलेली निवेदने थेट संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या हाती सोपवत समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. बहुतांश प्रकरणात वेळीच निकाल लावण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तर अनेक प्रकरणांचा निकाल त्याच वेळी लावण्यात आला.
खामला येथील जनसंपर्क कार्यालयात गडकरी यांना विविध समस्या, अडचणी तसेच मागण्यांशी संबंधित निवेदने लोकांनी दिली. यातील बहुतांश विषय नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय आदींशी संबंधित होते. रविवारच्या जनसंपर्क कार्यक्रमाला या सर्व कार्यालयांशी संबंधित प्रतिनिधींना हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नगर भूमापन अधिकारी, उपजिल्हाधिकारी (सेतू), समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, भूमी अभिलेख, महानगरपालिका, नासुप्र, सीआरसी सेंटर येथील अधिकारी उपस्थित होते.
लोकांनी दिलेल्या निवेदनांवर गडकरी यांनी चर्चा करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. काही प्रकरणांमध्ये थेट संपर्क साधत प्रश्नांचे त्याच वेळी निराकरण करण्यात आले. नागरी सुविधांच्या संदर्भातील मागण्या, शासकीय योजना आदी विषयांशी संबंधित निवेदने नागरिकांनी दिलीत. यावेळी विविध क्रीडा प्रकारांत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे गडकरी यांनी कौतुक केले. तर काही तरुणांचे विविध क्षेत्रांशी संबंधित इनोव्हेटिव प्रयोग देखील समजून घेतले.
‘मनःपूर्वक आभारी’
कर्करोगाच्या उपचारासाठी सहकार्य केल्याबद्दल एका महिलेने गडकरी यांचे आभार मानले. ‘मी गेल्या काही वर्षांपासून कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खलावली आहे. माझ्या उपचाराकरिता लागणारे औषध अंत्यत महाग आहे. आपल्याला संपर्क साधला असता तातडीने मदत मिळाली. त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे,’ या शब्दांत महिलेने पत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त केली.