नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात वादविवाद, हाणामारी या काही नवीन गोष्टी नाहीत, पण आता विधिमंडळ परिसरातही या घटना सातत्याने होत आहे.मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातील दोन पक्षातील कार्यकर्त्यांच्या हाणामारीने चार दशकांपूर्वीच्या घटनेला उजाळा मिळाला आहे. मुख्य म्हणजे ही घटना नागपूर येथे घडली होती.१९८२ सालची ही घटना आहे. त्यावेळी बाबासाहेब भोसले यांच्या हाती महाराष्ट्राची धूरा होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सर्वांना धक्का देत बाबासाहेब भोसले यांची निवड केली. जानेवारी १९८२ ते फेब्रुवारी १९८३ पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पण एवढा अल्प कालावधी देखील गाजला.
त्यांच्या नेतृत्त्वातील सरकारला सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला. नागपूर येथे अधिवेशन सुरू असताना बाबासाहेब भोसले यांनी विरोधकांवर टिकाटिपण्णी सुरू केली. मात्र, ही टिकाटिपण्णी करताना त्यांचा तोल सुटला आणि त्यांच्याच आमदारांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले. ‘आमच्या आमदारांची भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची आहे’ मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच आमदारांविषयी केलेले हे व्यक्तीपरीक्षण सर्वसामान्यांसाठी मजेशीर तर काँग्रेस आमदारांसाठी संतापजनक ठरले.
त्यामुळे या आमदारांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांविरुद्ध हक्कभंगाचा ठराव आणला. यानंतर संध्याकाळी झालेल्या बैठकीत गोंधळाला सुरुवात झाली. आमदारांनी बाबासाहेब भोसलेंवर अपशब्दांचे टिकास्त्र सोडले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, विधिमंडळातील कर्मचाऱ्यांनी दिवे बंद केले तरीही गोंधळ थांबला नाही.
थोड्यावेळाने याच आमदारांनी बाबासाहेब भोसल्यांना धक्काबुक्की सुरू केली. यात त्यांची चप्पल तिथेच पडली. शेवटी त्यांना सुरक्षारक्षकांचा आधार घ्यावा लागला. सुरक्षारक्षकांनी त्यांना बाहेर काढून त्यांच्या निवासस्थानी पोहोचवले. या प्रकरणात भाऊराव पाटील, सूर्यकांता पाटील, सतीश चतुर्वेदी, अशोक पाटील, प्रेमानंद आवळे आणि राम पेंडागळे या सहा आमदारांना बडतर्फ करण्यात आले. इंदिरा गांधींनी हे बंड शांत केले असले तरीही बाबासाहेब भोसले यांची मात्र मुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी झाली आणि वसंतदादा पाटील यांच्याकडे राज्याची सुत्रे सोपवण्यात आली.
या घटनेला जवळजवळ चार दशके लोटली, पण महाराष्ट्राच्या विधिमंडळातील अशा घटनांवर अजूनही अंकुश लावता आलेला नाही. राजकीय वाद वेगळा, पण तो धक्काबुक्कीपर्यंत पोहोचल्याने राज्याची प्रतिमा डागाळत आहे, याचे भान सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही नाही.महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच देशाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड तसेच, त्याआधी अनिल परब आणि शंभूराजे देसाई यांच्यातील वादाने चार दशकांपूर्वीचा हा किस्सा पुन्हा चर्चेला आला आहे. जनतेच्या प्रश्नांपेक्षा अधिवेशनातील राडा आणि मारहाणीच्या घटनांनी जास्त लक्ष वेधले आहे.