यवतमाळ : शहराच्या दक्षिणेला, गोधनी मार्गावर निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरपायथ्याशी आई वाघाईचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. निळोणा गावातील वाघाई देवी ही अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी मानली जाते. भक्तांची देवीवरील अतूट श्रद्धा आजही कायम असून, नवरात्रीत मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला आहे. गोधनी ते बरबडा या गावांच्या मधोमध, सुमारे ४०० वर्षांपूर्वी वाघाईचे हे मंदिर बांधले गेले. नंतर सुमारे ५० वर्षांपूर्वी निळोणा धरणाच्या बांधकामासाठी गावाची जमीन अधिग्रहित झाली, गावाचे स्थलांतर झाले, पण देवीचे मूळ स्थान तसेच कायम राहिले. वाघाईची मूर्ती स्वयंभू, सुमारे अडीच फूट उंच असून, अतिशय लोभसवाणी आहे. रोज तिचा साजशृंगार केला जातो.
तिच्या समोरच वाघांच्या मूर्ती असून, देवीच्या वाहनाचे प्रतिक म्हणून त्यांची पूजा केली जाते. हा संपूर्ण परिसर पूर्वी घनदाट जंगलाचा होता. त्यामुळे या मंदिरात वाघ व इतर वन्यप्राणी आश्रय घ्यायचे असे सांगितले जाते. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार, सुरुवातीला हे मंदिर डोंगराच्या कपारीत होते; मात्र भक्तांच्या तपश्चर्येमुळे आई स्वतः पायथ्याशी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे. मंदिराजवळून नागमोडी वळण घेत वाघाडी नदी वाहते. या नदीवर उभारलेल्या निळोणा धरणामुळे आजही यवतमाळ शहराला पाणीपुरवठा होतो. गर्द हिरवळ, डोंगररांगा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले वाघाईचे मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर पर्यटकांना भुरळ घालणारे निसर्गरम्य ठिकाण झाले आहे.
मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. चैत्र व अश्विन नवरात्र हा येथील प्रमुख उत्सव असून, दूरदूरवरून भाविक येथे येतात. ग्रामदैवत म्हणून वाघाईबद्दल बरबडा, चौधरा, पांढरी, खरुला, गोधनी, जांब तसेच यवतमाळ शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड श्रद्धा आहे. पूर्वीच्या काळात येथे येण्यासाठी पायवाटाच होती. जंगल, डोंगरकपाऱ्या व वाघांचे वास्तव्य असूनही भक्त निर्भयपणे दर्शनाला येत. श्रद्धाळूंच्या मते, वाघांनी कधीही कुणाला इजा पोहोचवली नाही; हे देवीचेच संरक्षण मानले जाते.
पूर्वी येथे छोटेसे मंदिर होते; मात्र भक्तांच्या योगदानातून आज ५० फूट उंचीच्या कळसासह भव्य मंदिर उभारले गेले आहे. अलीकडेच विधिवत कलशस्थापना पार पडली. गाभारा तसेच मंदिराचा परिसर आकर्षकपणे सुशोभित करण्यात आला आहे. शासनाच्या सहयोगातून बांधलेल्या सभागृहात विवाहसोहळे व कौटुंबिक कार्यक्रम होत असतात. यामुळे देवस्थान हे धार्मिकाबरोबरच सामाजिक उपक्रमांचेही केंद्र बनले आहे.
यवतमाळमधील पत्रकारांनी येथे वृक्षलागवड केली असून, मूळ स्थान असलेल्या टेकडीवर पुन्हा मंदिर उभारण्याचा संकल्पही भक्तांनी केला आहे. याशिवाय परिसरात बाग, पर्यटन सुविधा आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा विश्वस्तांचा मानस आहे. हा परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित असला तरी शासनाकडून अद्याप ठोस विकासकार्य झालेले नाही. त्यामुळे भक्तांनी आणि देवस्थान विश्वस्तांनी वाघाई देवीच्या श्रद्धास्थानाचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे.