अकोला : दिल्ली स्फोट प्रकरणात जिल्ह्यातील एका तरुणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. जिल्ह्यातील एक तरुण दिल्लीत त्यावेळी जवळपास असल्याचे उघड झाले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या हालचाली देखील संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तब्बल १० तास त्याची चौकशी केली. त्यात नेमके काय आढळले, हे गुलदस्त्यात असून पोलिसांकडून माहिती गोपनीय ठेवण्यात येत आहे.
राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ मोठा स्फोट झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या स्फोटामुळे अनेकांचा बळी गेला, तर सुमारे ३५ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. स्फोट प्रकरणाचा सुरक्षा यंत्रणेकडून कसून तपास केला जात आहे. या प्रकरणाशी आता अकोला जिल्ह्याशी काही धागेदोरे जोडले आहेत का? या दृष्टीने तपास सुरू झाला. त्याचे कारणही तसेच असून जिल्ह्यातील एका तरुणाच्या संशयास्पद हालचाली होत्या. घटनेच्या दिवशी तो दिल्लीमध्येच होता. जिल्ह्यातील पिंजर पोलीस ठाण्यांतर्गत एका गावातील तरुणावर पोलिसांचा संशय बळावला होता. घातपाताच्या कारवाईत सहभाग राहण्याच्या शक्यतेवरून त्याच्यावर नजर ठेवण्यात आली होती. दिल्ली येथे १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाच्या काळात हा तरुण जिल्ह्यातून बेपत्ता झाला होता. त्याच दिवशी त्याचे मोबाइल लोकेशन दिल्लीत असल्याचे समोर आले. त्या दिवशीपासून विविध माध्यमांतून पोलिसांकडून तरुणाचा शोध घेण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केल्याची माहिती आहे. स्फोट झाला त्यावेळी हा तरुण दिल्लीत काय करीत होता? याची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली. तरुणाच्या मोबाइल व त्याचा कॉल रेकॉर्ड तपासला जात असून सध्या प्राथमिक चौकशी केल्याची माहिती आहे. इतरही तांत्रिक माध्यमांतून तरुणाची माहिती घेण्यात येत आहे. सर्व बाजूने पोलीस तपास केला जात आहे. या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्याची सर्व प्रक्रिया अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली. या तरुणाची पिंजर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. दिल्ली स्फोट प्रकरणाच्या देशव्यापी तपासात अकोल्याशी काही धागेदोरे जोडले आहेत का? यावरून उलटसुलट चर्चांना पेव फुटले. राज्यात अत्यंत संवेदनशील शहर म्हणून अकोला ओळखले जाते. जिल्ह्यात अनेक वेळा दंगलीचे प्रकार सुद्धा घडले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
