गेल्या काही दिवसांपासून अंबाझरी तलावात बुडून मृत्यू पावणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे. महापालिका, पोलीस, जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरण याला कारणीभूत ठरले आहे. रविवार आणखी एका मुलाचा पोहण्याच्या नादात बुडून मृत्यू झाला. गेल्या महिनाभरात ४ तरुणांचा अंबाझरीत बुडून मृत्यू झाला असून अजून किती बळींची वाट प्रशासन बघणार, असा सवाल नागपूरकर करत आहेत.

सध्या पावसाळा असल्याने तलाव तुडुंब भरला आहे. रविवारी रिमझिम पावसात अंबाझरी तलावावर दोन भावंडासह फिरायला आलेल्या युवकाला पाण्यात उतरण्याचा मोह आवरता आला नाही. पाण्यात उतरताच त्याचा बुडून मृत्यू झाला. रोहित राजेंद्र वरखडे (१८, आंबेडकर सोसायटी, मानकापूर) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे.

रोहित हा लहान भाऊ तन्मय आणि चुलत भाऊ अंजन यांच्यासोबत रविवारी सकाळी ११ वाजता अंबाझरी तलावावर फिरायला आला होता. रविवार असल्याने तलावावर गर्दी होती. परंतु, कुणीही मदतीला धावून आले नाही. रोहित बारावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील ऑटोचालक असून आई शेतमजूर आहे.