भंडारा : राज्यात गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यातील आंबाटोली भागात घटली आहे. येथे लहान भावाने घरगुती वादातून मोठ्या भावाची हत्या केलीय.
घरगुती वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या मित्रासोबत मिळून हत्या करणाऱ्या भावाने ही घटना सामान्य मृत्यू म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तपास करून काल गुरुवारी रोजी ही घटना हत्या असल्याचं स्पष्ट केलं.
आरोपीने दोन दिवसांपूर्वी मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी विटांनी वार करून ही हत्या केली होती. शहरातील आंबाटोली परिसरात ही घटना उघडकीस आली. या संदर्भात पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मृताचे नाव रोशन प्रकाश वासनिक (वय ३५, रा. आंबाटोली आंबेडकर वॉर्ड, तुमसर) असं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मृताचा धाकटा भाऊ राकेश प्रकाश वासनिक (वय ३१) आणि किरण उर्फ लारा मारबते (वय २८, रा. कुंभारे वॉर्ड, तुमसर) यांना अटक केली आहे.
मंगळवार ५ ऑगस्ट रोजी रोशन, त्याचा धाकटा भाऊ राकेश आणि मित्र किरण उर्फ लारा दारू पिण्यासाठी गेले होते. दारू पिल्यानंतर राकेशने त्याचा मोठा भाऊ रोशनशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि विचारले ‘की तू आपल्या आईशी का भांडतोस’. या मुद्द्यावरून राकेश आणि रोशनमध्ये झालेल्या वाद इतका वाढला की राकेश आणि त्याचा मित्र किरण यांनी रोशनला पकडलं आणि मारहाण केली. त्यांनी त्याच्यावर विटांनी हल्ला केला. त्यानंतर रोशन घरी आला आणि बाहेर असलेल्या ओट्यावर झोपला.
मद्यधुंद अवस्थेत राकेशने रोशनच्या पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आधीच गंभीर जखमी असलेल्या रोशनचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला असं दर्शवण्यात आलं की रोशनचा मृत्यू दारूच्या नशेत झाला आहे. परंतु काही स्थानिकांना यावर संशय आला. पोलिसांनी सखोल तपास केला असता रोशनची हत्या झाल्याचं आढळून आलं.
पोलिसांनी किरण उर्फ लारा आणि राकेशला अटक केली. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०३ (१), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक मयंक माधव, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.