जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यात निंबादेवी धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह मंगळवारी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला. सातपुड्याच्या पायथ्याशी सावखेडा सीम गावाजवळ निंबादेवी धरण असून, त्याठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यापूर्वी, या धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अनेकांनी जीव देखील गमावला आहे. त्यामुळे निंबादेवी धरण भरल्यानंतर त्या परिसरात कोणालाच फिरकू दिले जात नाही.
तिथे पोलीस बंदोबस्तही लावला जातो. यंदा, पावसाला अद्याप जोर नसल्याने धरण भरलेले नाही. त्यानंतरही तिथे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील आठ तरूण रविवारची सुटी घालविण्यासाठी गेले होते. त्यापैकी जतीन वार्डे (१८) हा खोल पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यावर बुडाला.
रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत तसेच सोमवारी दिवसभर निंबादेवी धरणाच्या पाण्यात यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या पथकाने स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने जतीनचा शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नव्हता. धुळे येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मंगळवारी सकाळी पुन्हा त्याचा शोध घेण्यात येणार होता. तत्पूर्वीच, नऊच्या सुमारास जतीनचा फुगलेल्या स्थितीतील मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगताना दिसला. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून पोलिसांनी तो यावल ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला.