अकोला : शहरातील बहुचर्चित अक्षय नागलकर तरुणाच्या बेपत्ता प्रकरणाला धक्कादायक वळण प्राप्त झाले. दिवाळीच्या दिवशी आठ जणांनी अक्षयला जेवणासाठी हॉटेलमध्ये बोलावून त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह शेतातून जाळून टाकल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला चार आरोपींना अटक केली. उर्वरित चार आरोपींना अहिल्यानगर, बाळापूर व शहरातून ताब्यात घेण्यात आले. अटकेतील आरोपींची संख्या आता आठ झाली आहे.  

शहरातील डाबकी रोड पोलीस ठाण्यामध्ये शिला विनायक नागलकर यांनी त्यांचा मुलगा अक्षय नागलकर (वय २६ वर्ष, रा. मारोती नगर, जुने शहर) हा २२ ऑक्टोबर रोजी  सायंकाळी ५ वाजता बाहेर जाऊन येतो, असे सांगून घरून गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेला चौकशीसाठी पथके गठीत करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे चार, डाबकी रोड पोलिसांचे दोन व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे दोन असे एकूण आठ पथकांनी शोध सुरू केला. संशयित चंद्रकांत बोरकर याला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने ब्रम्हा भाकरे, रोहित पराते, क्रिष्णा भाकरे, आशु वानखडे, शिवा माळी, आकाश शिंदे व अमोल उन्हाळे या आठ जणांनी अक्षयला भौरद येथील हॉटेल एमएच ३० येथे जेवणासाठी बोलावले. पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या करण्यात आली. मृतदेह ब्रम्हा भाकरे याचे मोरगाव भाकरे येथील शेतातील टिनाच्या शेडमध्ये जाळून टाकल्याची कबुली आरोपींनी दिली.

या प्रकरणात चंद्रकात बोरकर, ब्रम्हा भाकरे, क्रिष्णा भाकरे, आशू वानखडे यांना सुरुवातीलाच अटक झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रोहित पराते व अमोल उन्हाळे यांना अहिल्यानगर येथून, तर नारायण मेसरे याला बाळापूरमधून ताब्यात घेतले. आरोपी आकाश शिंदे हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना अकोला रेल्वेस्थानकावरून त्याच्या मुसक्या आवळल्या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि गोपाल ढोले, पोउपनि गोपाल जाधव, अंमलदार शेख हसन, रवींद्र खंडारे, अब्दुल माजिद, महेंद्र मलिये, किशोर सोनोने, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, गोकुळ चव्हाण, उमेश पराये, आकाश मानकर आदींच्या पथकाने केली.