नंदुरबार : प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाची महाआरती १००१ दाम्पत्यांच्या हस्ते येथे करण्यात आली. यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.या अध्यात्मिक सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रयागराज येथील महाकलशाची महाआरती करण्याचा मान राज्यात नंदुरबारला प्रथम मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यासपीठावर उपस्थित विविध संप्रदायातील साधू, संतांची उपस्थिती कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. कार्यक्रमात हर हर महादेवचा गजर करत पुणेरी पथकाने  ढोल वादन केले. व्यासपीठावरुन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अनुलोम यांच्या मार्गदर्शनात प्रयागराज येथील जलकलश पूजन कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी, १४४ वर्षानंतर  महाकुंभ आल्याने मानवी आयुष्यातील आपल्याला  मिळालेली एकमेव संधी होती, असे सांगितले. प्रयागराज येथे त्रिवेणी  संगम आहे. संगमात स्नान केल्यानंतर पुण्य लाभत असल्याची  भाविकांची श्रध्दा आहे. यामुळे तब्बल ६५ कोटी बांधवांनी  तेथे स्नान केले. प्रयागराज येथील महाकुंभ सोहळा सर्वात  मोठा अध्यात्मिक सोहळा होता. ज्या भाविकांना तेथे जाता आले नाही, त्यांच्यासाठी नंदुरबारमध्ये प्रयागराज  येथील महाकलशाची महाआरती सोहळा आणि सुमारे एक  लाखांहून अधिक पवित्र गंगाजल बाटल्यांच्या वाटपाचा सोहळा आयोजित  केल्याचे त्यांनी सांगितले.

नंदुरबार येथे ‘अनुलोम’ आणि विविध हिंदू संघटनांच्या मदतीने आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ जलकलशाच्या महाआरती सोहळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशाव्दारे कौतुक केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी, प्रयागराज येथे झालेला महाकुंभ हा संस्कृती आणि सभ्येतेचे दर्शन घडविणारा सोहळा होता, असे नमूद केले. डॉ. विजयकुमार गावित, जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.विक्रांत मोरे, ॲड.राऊ मोरे, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अनुलोमच्या मदतीने नंदुरबारमध्ये आयोजित केलेला हा धार्मिक कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि समरसतेचे उदाहरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

व्यासपीठावर भागवताचार्य रवींद्र पाठक महाराज -नंदुरबार), गणेश जोशी महाराज- चौपाळे, चंद्रकांत रोडे महाराज -भालेर, निताईपारदास महाराज – कुकरमुंडा, दशरथ महाराज- भादवड, गुमानसिंग महाराज- सुकवेल, जानी महाराज, कुलकर्णी महाराज, दवे महाराज – नंदुरबार, आरती दिदी, दिलादास महाराज- शेही, गिरीश महाराज -लहान शहादा, संतोष महाराज- जोगनीपाडा, कौसल्या माताजी -धानोरा, गावंजी महाराज, रेवंता महाराज, माधव श्यामसुंदर, भद्रसेन प्रभूजी, सुदर्शनदास प्रभूजी, ईश्वर महाराज-नंदुरबार, विश्वदास महाराज -देवलीपाडा, बलदेवजी महाराज- नंदुरबार, योगिता दिदी- नंदुरबार, देवेंद्र पांढारकर- शनिमांडळ या साधू, महंतांची उपस्थिती होती.

प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जलकलश मध्य प्रदेशातून प्रथमच नंदुरबारमध्ये दाखल झाले. महाराष्ट्रात जलकलश आरतीसाठी नंदुरबार शहराला प्रथम मान मिळाला. यामुळे या कार्यक्रमाबाबत शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सायंकाळी सहापासून भाविकांनी पोलीस कवायत मैदानावर हजेरी लावली. महाकलश आरतीला १००१ दाम्पत्यांसाठी सर्वात पुढे बसण्याची व्यवस्था होती.तर स्वयंसेवक कार्यक्रमस्थळी त्रिवेणी संगमावरून आणलेल्या गंगाजल बाटल्यांचे वाटप करीत होते. ॲड. प्रितम निकम यांनी आभार मानले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1001 couples worship the mahakumbh jal kalash in nandurbar nashik news amy