नाशिक : जिल्ह्य़ातील मालेगाव शहर करोनाचे केंद्रस्थान झाले असून शहरात बंदोबस्तावर असतांना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली. यातील १७० बाधित पोलिसांनी करोनावर मात केली आहे.

मालेगाव येथे करोनाचा उद्रेक पाहता मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन हजाराहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरून परिस्थिती हाताळत असतांना अनेकांना करोनाची लागण झाली. यामध्ये तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीत १७० पोलिसांनी करोनावर मात केली आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे ८९, जालना राज्य राखीव दलाचे ३९, औरंगाबाद राज्य राखीव दलाचे १०, अमरावती राज्य राखीव दलाचे १३, धुळे राज्य राखीव दलाचे एक आणि धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे दोन, जळगाव पोलीस दलातील चार आणि मुंबई रेल्वे पोलीस १२ याप्रमाणे एकूण १७० पोलिसांनी करोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ११ करोनाबाधित पोलीस कर्मचारी उपचार घेत असून बरे झालेले पोलीस कर्मचारी योग्य ती खबरदारी घेत कामावर रुजू होत आहेत.