जळगाव : जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या जळगाव ते नंदुरबार मार्गावर अमळनेर स्थानकाजवळ गुरूवारी दुपारी कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे सात डबे इंजिनसह अचानक रूळावरून घसरले. या अपघातामुळे भुसावळहून जळगावमार्गे सुरतकडे चालणारी सर्व प्रकारची रेल्वे वाहतूक ठप्प झाली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रेल्वे वाहतूक सुरळीत झालेली नव्हती.
कोळसा वाहून नेणारी मालगाडी अमळनेर स्थानकावरून दुपारी दोनच्या सुमारास नंदुरबारकडे मार्गस्थ झाली होती. स्थानकापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावरील प्रताप महाविद्यालयाजवळ पोहोचताच काही कळायच्या आत मालगाडीचे सात डबे दुसऱ्या क्रमांकाच्या इंजिनसह रूळावरून खाली घसरले. अपघात घडला त्यावेळी रेल्वे गाडीचा वेग सुदैवाने कमी होता. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, धावत्या रेल्वेचे डबे रूळावरून खाली घसरल्याने आजूबाजुच्या रुळांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय कोळसा भरलेल्या मालगाडीच्या काही डब्यांची मोडतोड झाली. डब्यांची चाके निखळली. डब्यांमध्ये भरलेला दगडी कोळसा इतरत्र विखुरला गेला. ज्यामुळे रेल्वे प्रशासनाची मोठी आर्थिक हानी झाली.
दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने जळगाव ते सुरत मार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. १९००७ सुरत ते भुसावळ आणि १९००८ भुसावळ ते सुरत एक्स्प्रेस अनुक्रमे गुरूवार व शुक्रवारसाठी रद्द करण्यात आली. याशिवाय, गुरूवारी ५९०७५ नंदुरबार ते भुसावळ स्पेशल प्रवासी गाडी दोंडाईचा स्थानकापर्यंत धावली. १९१०५ उधना ते भुसावळ स्पेशल प्रवासी गाडी नंदुरबार स्थानकापर्यंत धावली. १९१०६ भुसावळ ते उधना स्पेशल प्रवासी गाडी नंदुरबार स्थानाकावरून सोडण्यात आली. काही गाड्या दुसऱ्या मार्गे वळविण्यात आल्या.
लांबच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांना परिणामी खूप हाल सहन करावे लागले. अनेकांना पर्यायी उपाय म्हणून एसटीच्या बसेसचा वापर करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने सुरूवात केली. त्यासाठी अपघातस्थळाच्या २०० मीटर परिसरातील वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला होता. मात्र, सात डब्यांमधील कोळसा रूळावर पडल्याने तो हटविण्यासाठी यंत्रणेला खूपच तारेवरची कसरत करावी लागली. स्थानिक पोलीस प्रशासन आणि रेल्वे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत अथक परिश्रम घेत होते. जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी अपघातस्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.